प्रवासातील मळमळ त्रासदायकच

प्रवासादरम्यान वाहनांमध्ये उलटी होण्याचा त्रास अनेकांना असतो. बस किंवा कारमधून प्रवास करताना अनेकदा मळमळ येते. त्यावर उपचार करण्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आपल्याबरोबरच प्रवासातील साथीदारांनाही प्रवासाचा आनंद घेता येत नाही. कारण असेही काही लोक असतात, ज्यांना दुसऱ्याला उलटी करताना पाहून मळमळ येते. जर आपणांस प्रवासाची आवड असेल, पण प्रवास करताना उलटीची भीती वाटत असेल तर काही सोप्या उपचारपद्धतींचा अवलंब करावा. त्या अस्वस्थता, उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्यांपासून संरक्षण देतील. आपला प्रवास मजेशीर बनवतील. आपण जेव्हा प्रवासाला जाल तेव्हा अनारदाणा, हिंग डायजेस्टर सोबत ठेवा. उंच डोंगरावर मळमळ झाल्यास या गोष्टी आराम देतात. आपल्यासोबत लिंबूपाणी किंवा कोणताही सोडा देखील घेऊन जाऊ शकता. यामुळे मळमळ थांबेल. चिंताग्रस्त असताना पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने उलट्यांपासून आराम मिळतो.

प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होत असेल तर जास्त वेळ खिडकीबाहेर पाहणे टाळा. यामुळे मेंदूला काही संकेत मिळू लागतात. मध्यवर्ती मज्जासंस्था गोंधळून जाते आणि उलट्या होतात. प्रवासादरम्यान फक्त हलके अन्नच खावे. अति अन्न खाल्ल्यानेही उलट्यांचा त्रास होऊ शकतो. फळांचे सेवन देखील करू शकता. आपण कार किंवा बसने प्रवास करत असाल, तर मागच्या सीटवर बसू नका. मध्यवर्ती बसा. शांत रहा. उलटीचा विचार अजिबात करु नका. मनात तशी भीतीही आणू नका. कधीकधी कल्पनेनेही उलटी होते. रिकामीपोटी, काहीही न खाता प्रवास करणेदेखील चुकीचे आहे. प्रवासात मोबाईल किंवा लॅपटॉपचा जास्त वापर करू नका.