त्वचेसाठी टोमॅटो

टोमॅटो हा आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्याचा वापर भाजी, कडधान्ये, कोशिंबीर, सूप अशा अनेक प्रकारात केला जातो, पण त्याची उपयुक्तता एवढ्यापुरती मर्यादित नाही. टोमॅटोमुळे आपल्या त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. टोमॅटोचा वापर फेस पॅकपासून टोनर सिरमपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरू शकता.

टोमॅटो त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्व ‘क’, ‘अ’ आणि ‘के’ असते. या सर्वांचा शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदा होतो. ही त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी जीवनसत्व ‘क’ ही सर्वात आवश्यक घटकांपैकी एक आहे. त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी अनेक महिला जीवनसत्व ‘क’ सप्लिमेंट्सचे सेवन करतात; मात्र जास्त खर्च न करता त्वचा सुंदर आणि तरुण ठेवायची असेल तर टोमॅटो खाण्याव्यतिरिक्त चेहऱ्यावर लावल्यानेही अनेक फायदे होतात.

टोमॅटो सिरम वापरल्यामुळे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जाऊ शकतात. त्वचा खोलवर स्वच्छ केली जाऊ शकते. अकाली वृद्धत्वाचे परिणाम देखील टाळता येतात. हे सिरम बनविण्यासाठी टोमॅटो किसून त्याचा रस काढा. या रसात जीवनसत्व ई कॅप्सूल जेल किंवा तेलाचे काही थेंब व थोडेसे एलोवेरा जेल मिसळून घ्या. सर्व गोष्टी मिसळून बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. हे फेस सीरम लावण्यापूर्वी चेहरा पाण्याने पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्या. आता सीरमचे दोन ते तीन थेंब घेऊन चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा. किमान 15 ते 20 मिनिटे लावा. नंतर धुवून घ्या. धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा.

आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर करा. चेहऱ्यावर टोमॅटो वापरल्याने त्वचा नितळ राहते. टोमॅटोच्या वापरामुळे त्वचा दीर्घकाळ तरूण राहते. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहे. याच्या नियमित वापराने तेलकट त्वचेची समस्या दूर होते, ज्यामुळे मुरुमेदेखील कमी होऊ लागतात. टोमॅटोमुळे त्वचेला उन्हापासूनही आराम मिळतो.