पंढरपुरजवळील विष्णूपद मंदिर

पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरास ‘विष्णूपद’ म्हणून ओळखले जाते. युगानुयुगे कर कटेवर ठेऊन विटेवर उभा असलेला विठूराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील या विष्णूपद मंदिरात विश्रांतीसाठी वास्तव्यास असतो. यावेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. गोपाळपूर जवळील नदीपात्रात ‘पुष्पावती’ आणि ‘चंद्रभागा’ नदीच्या संगमावर हे पुरातन मंदिर आहे. ७ फूट उंचीच्या जोत्यावर १२ फूट उंचीचे तसेच १६ दगडी खांबांवरचे २४ कमानींवर हे दगडी मंदिर उभारलेले आहे. यापैकी दोन खांबांवर विष्णू व श्रीकृष्ण प्रतिमाही कोरल्या आहेत.

येथे पंढरपूरातील एक नेते बबनराव बडवे यांचे समाधीस्थळ आहे. जवळच येथे नारदमुनींचे मंदिरही आहे. मुर्तीप्रमाणे इथे मुर्ती नसून भगवंताच्या चिखलात रूतलेल्या पदचिन्हांची पुजा करण्यात येते. भगवान श्रीकृष्णाची याठिकाणी समचरण आणि देहुडा चरण दोन्ही पदचिन्हे आहेत. तेथे लोण्याची वाटी, मुरली ठेवल्याच्या खुणा तसेच गाईंच्या खुराच्याही खुणा या पदचिन्हांच्या शेजारी आहेत. येथे कोनी दगडी कठडा असून पाणी वाहून जाण्यासाठी मोरीही आहे. एवढेच नाही तर सोबतच्या गोपाळांचीही पाऊले येथे उमटलेली दिसतात. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. जेव्हा देवी रूक्मिणी देवावर रूसून दिंडीर वनात आली, तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल ज्याठिकाणी पंढरपुरात प्रथम आले. ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक ‘विष्णूपद’ आहे. याठिकाणी एका मोठ्या शिळेवर देवाच्या पाऊलखुणा, काठी ठेवल्याची खूण आणि काल्याच्या वाडग्याची खूणसुद्धा आहे. याठिकाणी विठूरायाने आपले सवंगडी आणि गाईसह क्रीडा केल्या.

विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळे या खडकावरील ठिकाणास ‘विष्णूपद’ असे नाव मिळाले. मार्गशीर्ष महिन्यात देव याठिकाणी रहायला येतात, असे मानले जाते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात याठिकाणी भाविकांची दर्शनास गर्दी होते. अनेक भाविक नौकानयनाचा आनंद घेत विष्णूपदावर पोहोचतात. अनेक भाविक येथे दर्शन घेऊन नंतर वनभोजनाचा आनंद लुटतात. मार्गशीर्ष अमावस्येला देव परत पंढरपुरातील मंदिरात परततात. त्यादिवशी संध्याकाळी स्थानिक शेतकरी ज्वारीची ताटे वगैरे लावून रथ सुशोभित करतात. विष्णूपदावर अभिषेक केला जातो. त्यानंतर वाजतगाजत रथ पंढरपुरात जातो. संपूर्ण मार्गशीर्ष महिना पंढरीचा विठूराया या मंदिरात असतो.