घासणी उद्योग

भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी घासणी म्हणजेच स्क्रबरचा वापर सगळीकडे केला जातो. जेव्हा घासणीचा शोध लागला नव्हता, तेव्हा नारळाच्या शेंडीचा वापर घासणीसारखा केला जायचा. घासणीमुळे तेलकट – तूपकट झालेली भांडी लख्खं होतात. चकाकू लागतात. घासणी उद्योगामध्ये कमी गुंतवणूक आणि जास्त नफा दडलेला आहे. हा लघुउद्योग घरच्या घरी सुरू करण्यासाठी जास्तीत जास्त रु. ३०,०००/- पर्यंत गुंतवणूक करावी लागते.
लघुउद्योगाच्या दृष्टीने घासणी व्यवसायाकडे पाहिल्यास आपल्याला ३ ते ४ कामगारांची गरज आहे. किमान १००० स्वे. फूट जागा या व्यवसायासाठी आवश्यक आहे. घासणी बनवण्यासाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसते. या उद्योगासाठी बँकेकडून कर्जही मिळते. या उद्योगामध्ये स्क्रबर बनवण्याचे यंत्र, कंप्रेसर मशीन, स्क्रबर पॅकेजिंग मशीन आणि बॅच कोडिंग मशीन यांची तुम्हांला गरज आहे. त्याचप्रमाणे स्टेनलेस स्टील वायर, ब्लिस्टर कॅप, कॅरल पेपर, एचिंग केमिकल हा कच्चा माल आवश्यक आहे.
अगदी छोट्या बाजारांपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत, ऑनलाइन विक्री दुकानांमध्येही आपल्याला घासणी विक्रीसाठी ठेवता येऊ शकते. ज्यामुळे भरपूर नफा मिळवता येतो. घासणी बनवण्यासाठी ४ रुपयांचा खर्च येतो आणि ती घासणी घाऊक बाजारात तब्बल ६५ रुपयांपर्यंत विकली जाते, तर किरकोळ विक्रेते १०० रुपयांपर्यंत विकतात. एकूण गुंतवणूक आणि मिळणारा नफा यांचा विचार केल्यास गुंतवणूकीच्या ३० टक्के नफा आपल्याला या उद्योगात मिळतो. घासणी व्यवसायात तोटा तुम्हांला फक्त कच्च्या मालाचा दर्जा घसरल्याने होऊ शकतो. त्याचप्रमाणे ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन त्यांच्या सल्ल्याने जर आपण आपल्या उत्पादनात बदल करत गेलो, तर उत्पादन विक्रीत वाढ होईल.