
नाशिक जिल्ह्यात सह्याद्री पर्वतावरील ‘डोलबारी’ रांगेवर सालोटा हा गडकिल्ला आहे. गुजरात मधील डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हा किल्ला आहे. सालोटा किल्ला हा उंच व सरळसोट आहे. सालोट्यावर प्रवेश करतानाचे तीन दरवाजे आजही मजबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडे पाण्याचे दोन टाक आहेत. पुढे आणखी एक प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर गडमाथ्यावर पोहोचता येते. गडमाथ्यावर आता काही अवशेष नाहीत. सालोट्यावरुन साल्हेर किल्लाही पाहता येतो. गडावर जाण्यासाठी वाघांबे, माळदर, साल्हेरवाडी हे तीन मार्ग आहेत.
माळदरमार्गे गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरात नाही. ही वाट माळदर गावातून जाते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधून जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास लागतात. साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट अवघड आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी गडावर पोहोचता येते. ही वाट मळलेली असल्याने बरोबर किल्ल्यावर पोहोचता येते. या किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. किल्ल्यावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.