आरोग्यदायी चिप्स घरीच बनवा

संध्याकाळच्या वेळी मुलांना भूक लागते. मुलांना संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत-हलकेफुलके हवे असते. खाण्यातून वेगळाच आनंद मिळत असतो. मुलांना त्यांच्या मोकळ्या वेळेत चिप्स खायला आवडतात; मात्र, बाजारात मिळणारे चिप्स आणि स्नॅक्स अनेकदा आरोग्यासाठी हानिकारक असतात. मुलांबद्दल बोलायचे झाले, तर जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे ते अनेकदा वेष्टनबंद चिप्सची मागणी करतात. बाजारात मिळणाऱ्या चिप्समध्ये ‘प्रिझर्व्हेटिव्ह’ असतात, ज्याचे आरोग्यावर परिणाम होतात.

मुलांच्या चिप्स आणि स्नॅक्स खाण्याच्या सवयीसाठी काही पौष्टिक पर्याय आहेत, याद्वारे आपण मुलांची खाण्याची इच्छा चांगल्या आरोग्यदायी पद्धतीने पूर्ण करू शकता. मुलांना बाजारात मिळणाऱ्या चिप्सपासून दूर ठेवण्यासाठी घरच्या घरी वांग्याच्या चिप्स बनवू शकता. वांगी शक्यतो मुलांना आवडत नाहीत. परंतु, अशा पद्धतीने केलेले चिप्स मुले आवडीन खावू शकतात. हे चिप्स कुरकुरीत व चवीला चांगले असतात. याकरिता सर्वप्रथम वांग्याचे पातळ काप करून बेकिंग ट्रेवर पसरवावेत. या वांग्याच्या कापांवर थोडे ऑलिव्ह ऑइल टाकावे. चवीनुसार मीठ, मिरपूड आणि लाल तिखट भुरभुरावे. आता ते हलके तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत काही मिनिटे बेक करुन मुलांना खायाला द्यावे.

रताळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तसेच, त्याच्या चिप्समध्ये कमी कॅलरी आणि कमी चरबी असते. आपण रताळ्याचे चिप्स बनवू शकता. त्यासाठी प्रथम रताळ्याचे पातळ काप करून घ्यावेत. आता वर मीठ, काळी मिरी, ऑलिव्ह ऑईल, पेपरिका पावडर आणि ओरेगॅनो घालून चांगले लावून घ्यावे. आता त्यांना एअर फ्रायरमध्ये 10-15 मिनिटे शिजवावे.

मूग डाळीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हे पचायला हलके असून आरोग्यासाठीही चांगले आहे. आपण आहारात मूग डाळ चीप्सच्या रूपात देखील समाविष्ट करू शकता. सर्वप्रथम मूग डाळ किमान दोन तास पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर ग्राइंडरमध्ये बारीक करावी. आता एका वाडग्यात रवा, गव्हाचे पीठ आणि मसुराचे पीठ घ्यावे. सर्व काही चांगले मिसळून त्यात सुकी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि तिखट घालून मिसळून घ्यावे. हे मिश्रण पिठासारखे मळून त्याचे छोटे गोळे करून लाटून घ्यावे. सुरीने चिप्सच्या आकारात कापून चांगले बेक करावे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
19,284 वेळा पाहिलं