काकडीची चटणी

उन्हाळ्याचे दिवस आहेत. आहारातही सौम्य पदार्थ असावेत हे वाटणे स्वाभाविक आहे. आज बनवूया दक्षिण भारतात प्रसिद्ध असणारी काकडीची चटणी !

साहित्य : काकडी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, २ हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, २ लसूण पाकळ्या, २ ते ३ चमचे चिंचेचा कोळ, अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा हरभरा डाळ, मीठ चवीनुसार, ओली कोथिंबीर, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, २ चमचे तेल.

कृती : सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून सोलून घ्यावी. नंतर ती किसून घ्यावी. एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात हिरवी मिरची, उडीद डाळ आणि चणाडाळ घालून भाजून घ्यावी. गॅस बंद करून भांडे थंड होऊ द्यावे. हे भाजलेले समान मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यावे. त्यात जिरे, मीठ आणि लसूण पाकळ्या घालून बारीक वाटण बनवावे. या वाटणामध्ये थोडी किसलेली काकडी आणि चिंचेचा कोळ घालावा. चांगले मिसळून घ्यावे. हे वाटण एका भांड्यात काढून घ्यावे. त्यात उरलेली किसलेली काकडी मिसळावी. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावे. काकडीच्या चटणीला तडका देण्यासाठी भांड्यामध्ये तेल गरम करावे. त्यात जिरे आणि मोहरी टाकावी. ती तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या टाकाव्यात. आता त्यात चिमूटभर हिंग टाकावा. हा तयार तडका चटणीवर घालून चांगले मिसळून घ्यावे. चटणी तयार !

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
615 वेळा पाहिलं