आगोंद समुद्रकिनारा

आगोंद समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील एक शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. ज्यांना किनाऱ्यावरील शांततापूर्ण वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल, गर्दी, गडबड-गोंगाटापासून दूर वेळ घालवायचा असेल अशा पर्यटकांसाठी हे चांगले ठिकाण आहे. गोव्यातील हा समुद्रकिनारा जवळजवळ दोन मैलांपर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर उत्कृष्ट खाद्यपदार्थ आणि पेये मिळतात.

आगोंद किनारा पोहण्यासाठी योग्य आहे. येथे बोटीतून प्रवास करण्याचा मनसोक्त अनुभव घेता येतो. या किनाऱ्याजवळ कपडे आणि वेगवेगळ्या आकर्षक वस्तू विकणारी दुकाने असतात. हा समुद्रकिनारा स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी, चालत फिरण्यासाठी फार सुंदर आहे. या किनाऱ्यावर एखादी बोट भाड्याने घेऊन पर्यटक आगोंद किनाऱ्यापासून जवळच्या ‘बटरफ्लाय’ आणि ‘हनिमून’ किनाऱ्यांना भेट देण्यासाठी जाऊ शकतात. आगोंदमध्ये अनेक स्वस्त तसेच महाग रेस्टॉरंट्स, बार आणि कॅफे आहेत. येथे स्वादिष्ट अन्न आणि पेये उपलब्ध असतात. या किनाऱ्यावर आरामदायी कॉटेज, जंगलातील हॉटेल्स आणि वेलनेस रिट्रीट्स अशा प्रकारची राहण्याची सोय आहे. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा आहे. यावेळी हवामान स्वच्छ असते. पाऊस नसतो. गोव्यात गेल्यावर या किनाऱ्याला आवर्जून भेट द्यायलाच हवी. विमानाने गेल्यास येथे जाण्यासाठी वास्को विमानतळावर उतरावे लागते. तेथून अनेक वाहने उपलब्ध असतात.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
24,166 वेळा पाहिलं