बनवा बनवी – थरार आणि विनोद

मराठी रंगभूमीला नाटकांची एक समृद्ध आणि प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. आजवर अनेक सामाजिक, कौटुंबिक आणि ऐतिहासिक नाटकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र, बदलत्या काळानुसार प्रेक्षकांच्या आवडीनिवडी देखील बदलत आहेत आणि याच बदलत्या प्रवाहाची नाडी ओळखून ‘प्रभात थिएटर्स’ निर्मित एक अत्यंत वेगळे, नाविन्यपूर्ण नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ‘बनवा बनवी’ असे या मराठी नाटकाचे नाव असून, हे नाटक ‘हॉरर-कॉमेडी’ म्हणजेच भयपट आणि विनोद या दोन परस्परविरोधी जॉनर्सचे एक उत्कृष्ट मिश्रण असणार आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक समीर खांडेकर यांनी केले असून, त्यांनी एका वेगळ्या संकल्पनेला रंगभूमीवर उतरवण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.

नाटकाची कथा ही काही जवळच्या मित्रांभोवती फिरणारी आहे. हे सर्व मित्र आपल्या एका मित्राच्या ‘बॅचलर पार्टी’चे ग्रँड सेलिब्रेशन करण्यासाठी एका अत्यंत आलिशान आणि देखण्या व्हिलामध्ये एकत्र येतात. तरुण मुलांची पार्टी म्हटली की त्यात असणारी धमाल, मस्ती, मद्यधुंद वातावरण आणि जुन्या आठवणींना उजाळा देत चाललेला निखळ विनोद, हे सर्व काही सुरुवातीला पाहायला मिळते. सर्व काही अगदी सुरळीत आणि आनंदाने सुरू असते. पण, जशी जशी रात्र गडद होत जाते, तशी तशी या पार्टीला आणि त्यांच्या आनंदाला एक अचानक भयावह वळण मिळते.

या मित्रांना हळूहळू जाणीव होते की, ज्या आलिशान व्हिलामध्ये ते पार्टी करत आहेत, ती जागा प्रत्यक्षात ‘झपाटलेली’ आहे. एका क्षणात आनंदाचे रूपांतर भीतीमध्ये होते आणि त्यानंतर रंगमंचावर सुरू होतो तो थरारक प्रवास; ज्यामध्ये भीती, अंगावर काटा आणणारा गोंधळ आणि त्याच परिस्थितीत निर्माण होणारा निखळ विनोद प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या नाटकाच्या तगड्या स्टारकास्टचा विचार केला तर सुमित चव्हाण, ऋषभ मोरे, सोनाली गुरव, सुधाकर सोनवणे, ओमकार कदम, सिद्धी पोतदार आणि शंतनू रांगणेकर हे हरहुन्नरी कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच नाटकाला तांत्रिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी पडद्यामागील क्रू मेंबर्सनीही मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. सुमित पाटील यांनी नाटकाचे नेपथ्य सांभाळले आहे, तर चेतन पडवळ यांनी प्रकाशयोजनेच्या माध्यमातून भीतीचे वातावरण जिवंत केले आहे. निनाद म्हैसाळकर यांचे संगीत नाटकाचा थरार अधिक वाढवणारे असून चारुल देशपांडे यांनी वेशभूषेची धुरा सांभाळली आहे. या दर्जेदार कलाकृतीची निर्मिती श्रीमती ज्योती प्रमोद कठापूरकर आणि श्री. निखिल एकनाथ करंडे यांनी केली असून, श्रीमती प्रियांका हेमंत जोगी यांनी सहनिर्माती म्हणून जबाबदारी उचलली आहे. दीपक गोडबोले यांनी या संपूर्ण नाटकाचे सूत्रसंचालन केले आहे. एकूणच, हा हॉरर-कॉमेडीचा धमाका अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षकांमध्ये आतापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
24,664 वेळा पाहिलं