आजच्या जगात दररोज ताजेतवाने दिसणे फार गरजेचे आहे. कार्यालय असो की घर, आप ले व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे, असे प्रत्येक महिलेला वाटत असते. या धकाधकीच्या जीवनात अगदी रोज ताजेतवाने दिसण्यासाठी चेहर्यावर ‘मेक-अप’ असायला हवा, असा आपला समज असेल तर तो बाजूला ठेवायला हवा.
जीवनशैलीतील अगदी साध्या बदलांनी आणि काही उपायांनी दररोज ताजेपणाचा अनुभव घेऊ शकता. रोज स्वच्छ आंघोळ करावी. नियमितपणे केस धुवावेत. चेहरा धुण्यासाठी चांगल्या फेसवॉशचा वापर करावा . केसांची नीट काळजी घ्यावी. ‘मेक-अप’ करायचा असेल तर ‘लाइट’ आणि नैसर्गिक शेड्सचा वापर करावा. दिवसा ‘सनस्क्रीन’ लावूनच घराबाहेर पडावे. कोणताही हंगाम असला तरी ‘सनस्क्रीन’ टाळू नका.
ताजी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. नियमितपणे फळे आणि भाज्या खाव्यात. भरपूर पाणी प्यावे. यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातील. तुमच्या त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळेल. कायम हसत रहा. आनंदी, उत्साही राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मूड चांगला राहील. तुमच्या चांगल्या मूडचे प्रतिबिंब चेहर्यावर पडल्याशिवाय राहणार नाही.
रात्री शांत आणि भरपूर झोप घ्या. चांगल्या झोपेमुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता. झोप नीट झाली नाही तर चिडचिड होते. आपण कितीही महागडे उपाय केले, महागड्या ‘स्पा’मध्ये गेलात तरीही अपुर्या झोपेमुळे आपला चेहरा तजेलदार दिसणार नाही. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको.
भारतामध्ये प्राचीन काळापासून शरीराच्या काही भागांना मालिश करण्यात येते. हात, पाय आणि नाभी अर्थात बेंबीच्या ठिकाणी तेलाने मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात. पारंपरिकतेनुसार नाभीमध्ये तेल घालणे हे अधिक योग्य असून आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे नाभीमध्ये तेल घालून मालिश केल्याने पोटातील दुखणे कमी होते. मोहरीच्या तेलामध्ये आल्याचा रस अथवा आल्याचा किस मिसळून बेंबीमध्ये या तेलाचे ३-४ थेंब घालावेत. यामुळे पोटात होणारी मळमळ, उलटीसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. बरेचदा आंघोळ करताना बेंबीचा भाग हा दुर्लक्षित होतो; मात्र बेंबीमध्ये रात्री तेल घातल्यास स्वच्छ करणे लक्षात राहते. नाभीत साचलेला मळ काढून टाकण्यासाठी याची मदत मिळते. तेलामुळे नाभी स्वच्छ राहते.
योगा आणि आयुर्वेदानुसार, शरीराचे चक्र हे नाभीपासूनच सुरू होते. त्यामुळे शरीराचे संतुलन राखण्यासाठी नाभीमध्ये तेल घालून मालिश करण्यात येते. नाभीत तेल घातल्याने त्वचेचे आरोग्यही संतुलित राहते. यामुळे त्वचेला अधिक चमक येते, असेही सांगण्यात येते. डोके शांत ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. सांधेदुखीपासून सुटका मिळते. चेहऱ्यावर चमक यायला हवी असेल तर नारळ अथवा बदामाचे तेल नाभीमध्ये घालू शकता. यामुळे त्वचेला अधिक चमक येते. लवकरच कोरडी त्वचाही मऊ आणि मुलायम होते. रोज रात्री ३ थेंब नारळाचे अथवा बदामाचे तेल नाभीमध्ये घातल्यास फायदा होईल.
पोटातील दुखणे कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि कंबरदुखीपासून आराम मिळण्यासाठी बदाम तेलाचा वापर करावा. नाभीत मोहरीचे तेल घातल्याने अनेक गोष्टींपासून सुटका मिळते. फाटलेल्या ओठांसाठी, डोळ्यांच्या चांगल्या दृष्टीसाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी अथवा डोकेदुखीपासून सुटका मिळविण्यासाठी २-३ थेंब मोहरीच्या तेलाचा वापर रोज रात्री करावा.
साहित्य : ताजे दही – दोन ते अडीच कप (500 ग्राम), पावडर साखर – पाव कप, मँगो पल्प – 1 कप, काजू-बदाम – 4, पिस्ता – 5 ते 6, वेलची – 2
कृती : प्रथम दही जाड कापडात बांधून लटकवून ठेवा. दह्याचे सर्व पाणी निथळल्यावर घट्ट झालेले दही एका भांड्यात काढावे. या दह्यात साखर घालून त्याला घोटून श्रीखंड तयार करावे. त्यात मँगो पल्प, सुके मेवे, वेलची घालून फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवावे.
जाड आणि मजबूत केस प्रत्येकाला हवे असतात. केस निरोगी ठेवण्यासाठी आपण काय-काय करत असतो. एकापेक्षा एक महाग उत्पादने वापरतो. काही वेळेस घरगुती उपायदेखील केले जातात; परंतु तरीही केसांशी संबंधित समस्या कमी होत नाहीत. काही वेळेस तर त्या बंद झाल्या तरी पुन्हा त्रास सुरू होतो.काही वेळेस कळत-नकळतपणे आपण आपल्या केसांसंदर्भात काही अशा चुका करतो, ज्यामुळे केसांशी संबंधित समस्या वाढतच जातात. अशाच काही चुका, ज्याकडे वेळीच लक्ष देऊन आपण आपले केस सर्व समस्यांपासून वाचवू शकाल. केसांसंदर्भात या चुका कधीही करू नका.
केस वारंवार कंगव्याने विंचरणे टाळावे; कारण केस जास्त विंचरल्याने केस कमकुवत तर होतीलच; शिवाय ते तेलकटही होतील. गुंता झालेले केस सोडविण्यासा रुंद दातांचा कंगवा वापरावा; आणि हळुवारपणे जटा सोडवाव्यात.केस धुण्यासाठी कमीत कमी शाम्पू वापरावा. जास्त केस धुण्याने केस खराब होतात; पण तुम्ही कसेही जास्त दिवसांनी केस धुवू नका. जास्त वेळ केस न धुतल्याने डोक्यातील सुक्ष्म छिद्रे ‘ब्लॉक’ होतात, ज्यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच दर तिसऱ्या दिवशी केस धुणे चांगले असते.
जर तुम्ही केस वाळविण्यासाठी ‘हेअर ड्रायर’चा जास्त वापर करीत असाल तर असे करणे टाळावे. त्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात.केस ओले असताना सर्वात कमकुवत असतात. ओले केस झाडल्यावर ते अधिक तुटू शकतात. केसांच्या समस्या टाळण्यासाठी कधीही ओले केस विंचरून ‘हेअर स्टाइल’ करू नका. ते प्रथम वाळू द्यावेत, त्यानंतरच ‘स्टाइलिंग’ साधने वापरा.
कंगवा आणि ‘स्टाइलिंग’ साधने नियमितपणे स्वच्छ केली पाहिजेत. त्यांच्यावर साचलेली घाण तुमचे केस खराब करू शकते. कंगवा आणि ब्रश आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करावेत. काही महिन्यांच्या वापरानंतर ते बदलणे चांगले आहे, कारण त्यामुळे डोक्यात संसर्ग होऊ शकतो.केस मोकळे सोडून कधीही झोपू नका. कारण त्यामुळे त्यांचा गुंता होण्याची अधिक शक्यता निर्माण होते. संतुलित आहार न घेतल्यानेही केसांशी संबंधित समस्या निर्माण होतात.
नारळपाणी हे एक नैसर्गिक पेय आहे. शरीरासाठी ते अत्यंत गरजेचे आहे. शरीराला ऊर्जा पुरविण्याची क्षमता या पाण्यात असते, म्हणूनच रूग्ण, गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळपाणी हे मानवजातीसाठी एक वरदान आहे, म्हणून ते आवर्जून प्यावे. नारळाच्या पाण्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची क्षमता असते. कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या असणाऱ्यांनी नियमित नारळपाणी प्यावे. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाले तर ह्रदयाचे कार्य नक्कीच सुधारू शकते. नारळपाण्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहू शकते.
व्यायाम अथवा अती प्रमाणात शारीरिक हालचाल केल्यावर त्वरित शक्ती मिळण्यासाठी नारळपाणी प्यावे. व्यायाम आणि मेहनतीमुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. नारळपाण्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. नारळपाण्यामुळे तयार झालेला मूतखडा विरघळण्यासही मदत होते. नारळपाणी पिण्यामुळे ह्रदयाचे विकार होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.थकवा घालविण्यासाठी नारळपाणी हे नैसर्गिक पेय फायदेशीर आहे. एक कप नारळपाण्यामधून शरीराला ४५ ते ४६ कॅलरीज मिळतात. त्यामुळे नारळपाणी पिणे नक्कीच फायद्याचे ठरते. नारळपाण्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही कमी असते.
नारळपाण्यामध्ये पोटॅशिअम आणि इतर अनेक खनिजे असतात. पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी दिवसभरात एक ग्लास नारळपाणी प्यावे. नियमित नारळपाणी पित असाल तर त्वचेचे योग्य पोषण होते. त्वचेला जीवनसत्व ‘सी’ मिळते. त्यामुळे त्वचा टवटवीत आणि चमकदार होते. नारळपाण्यातील पोषक घटकांमुळे केस मजबूत आणि चमकदार होतात. केस गळणे थांबून केसांची वाढ होते. केसात कोंडा होण्याची समस्या कमी होते. नारळपाणी थंड असल्यामुळे शरीरात अपचन, पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते. नारळपाण्यामुळे पचनशक्ती सुधारते.
शाळांना उन्हाळी सुट्टी आहे म्हटल्यावर मुलांना रोज काहीतरी वेगवेगळा सुका खाऊ येता – जाता तोंडात टाकायला हवा असतो. मग अशावेळी नेहमी काय बनवून ठेवणार हा प्रश्न पालकांना भेडसावत असतो. अशावेळी आपण झटपट १५ ते २० मिनिटांत भडंग चिवडा घरच्याघरी बनवू शकतो.
साहित्य 4 मोठ्या वाट्या भडंग चुरमुरे (बाजारात भडंग कुरमुरे विकत मिळतात) फोडणीसाठी 3 चमचे तेल, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट कढीपत्त्यची 15 पानं 3 चमचे मेतकूट 2 चमचे लाल तिखट अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी आमचूर पावडर चवीपुरते मीठ चवीपुरती पिठीसाखर
कृती: १) भडंग कुरमुरे पातेल्यात घ्यावेत. तेल न घालता मध्यम आचेवर परतून घ्यावे. कुरमुरे सारखे ढवळत राहावे. परतून कुरकुरीत झालेले कुरमुरे परातीत काढून ठेवावे. २) त्याच पातेल्यात मंद आचेवर तेल गरम करावे. त्या तेलात शेंगदाणे तळून घ्यावे. थोडे लालसर झालेले शेंगदाणे बाजूला काढून ठेवलेल्या कुरमुऱ्यावर घालावेत. ३) कुरमुरे आणि शेंगदाणे मिक्स करावेत. त्यातच मेतकूट आणि लाल तिखटाचे मिश्रण घालून हलक्या हाताने ढवळून एकत्र करावे. ४) उरलेल्या तेलात फोडणी करावी. त्यात हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालावा. कुरमुरे फोडणीत घालावेत. झाऱ्याने मिक्स करावे. आमचूर पावडर, मीठ आणि साखर घालावे. एकजीव करावे. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे ठेवावे. भडंग चिवडा गार झाला की लगेच हवा बंद डब्यात भरून ठेवावा. भडंग चिवड्याचा रंग लालसर असतो. त्यामुळे लालसर रंग आणण्यासाठी काश्मिरी लाल मिरची पावडर वापरावी. ज्यांना चिवड्यामध्ये लसूण आवडतो त्यांनी फोडणीच्या वेळी फोडणीतच लसूण तळावा.
जर आपली मुले वारंवार रडत असतील, तर नवीन आईंनी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आई होणे ही एक वेगळीच अनुभूती असते. लहान मुलाच्या आवाजाने आईचे आयुष्य उजळून निघते. जेव्हा तेच मूल रडते तेव्हा आईलाही काळजी वाटू लागते. लहान मुले रडूनच आपल्या वेदना व्यक्त करतात. मूल पुन्हा-पुन्हा का रडत आहे, हे नवीन आईला कळत नाही. कधी-कधी आईला असे वाटते की, मुलाने लंगोट भिजवला असेल, ज्यामुळे तो रडत आहे. पण मुलाच्या रडण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
नवजात बाळ फक्त आईचे दूध पित असते. आईच्या चुकीच्या खाण्याच्या सवयीदेखील बाळाच्या समस्यांचे कारण असू शकतात. आईने पोटात गॅस निर्माण करणारे किंवा खूप मसालेदार अन्न खाल्ल्यास बाळाला त्रास होऊ शकतो. यामुळे आईला तसेच मुलांना अपचन, पोटदुखी आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. अनेक वेळा नवीन आई मुलाचा हात झटक्याने पकडते. ज्यामुळे हाड निखळू शकते. अशा स्थितीत मुले रडायला लागतात. त्यामुळे त्यांचा हात धरताना नेहमी काळजी घ्यायला हवी.
बाळाने परिधान केलेले कपडे देखील रडण्याचे कारण असू शकते. जर एखाद्या मुलास खूप घट्ट किंवा अंगाला टोचणारे कपडे घातले तर त्याला समस्या येऊ शकतात. यामुळे, बाळाच्या शरीरात टोचणे जाणवू शकते. अशा परिस्थितीत, मुलाला नेहमी हलके आणि मऊ कपडे घालायला लावा. याशिवाय हिवाळ्यात त्यांना खूप घट्ट कपडे घालणे टाळा. अनेक वेळा नवीन आई बाळाला खूप अन्न देते किंवा खूप दूध देते. जास्त दूध प्यायल्याने किंवा काहीही खाल्ल्यानेही मुलाची प्रकृती बिघडू शकते. जास्त खाल्ल्याने मुलाचे पोट फुगायला लागते.
त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागते. मग मूल रडायला लागते. जर तुमचे बाळ एकाच वेळी मुख्यतः संध्याकाळी रडत असेल, तर त्याला पोटशूळ देखील असू शकतो. या आजारात, मुलाच्या पोटात तीव्र वेदना होतात. काहीही खाण्यापिण्याची इच्छा नसते. हा आजार 3 महिन्यांपर्यंत बाळांना खूप त्रास देतो. कालांतराने तो आपणच बरा होतो.
शरीरावर जखमा होणे, यात विशेष काही नाही ! कधी खेळताना, काम करताना किंवा एखाद्या अपघातात अंगावर जखमा होतात. या जखमा भरुन येण्यास ठराविक वेळ जातो. कधीकधी जखम बरी झाली, तरी त्याचा डाग मात्र तसाच राहतो. हा डाग दिसण्यासारखा असला, तर नैराश्य येते. हे डाग घालविण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय करुन पहावेत.
मेथीचे दाणे रात्रभर भिजवावेत. सकाळी त्याचे वाटण करून लेप बनवावा. हा लेप जखमेवर लावावा. लेप पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. मेथीप्रमाणेच हळदीचा लेप बनवून लावल्यास जखम लवकर भरण्यास तसेच व्रण दूर होण्यास मदत होते. बटाट्याची साल काढून ती जखमेवर लावावी; मात्र ही साले स्वच्छ धुवून घ्यावीत.
लिंबू आणि टोमॅटो घरात सहज उपलब्ध असतात. जखम थोडीशी बरी झाल्यानंतर हा उपाय करावा. साध्या पाण्याने जखमेचा भाग स्वच्छ धुवून घ्यावा. त्यावर ओला आणि स्वच्छ कपडा ठेवा. काही तासाने ताज्या लिंबाच्या रसात बुडवलेले कापड या जखमेवर ठेवा.
त्वचा सुकल्यानंतर त्यावर टोमॅटोचा रस लावावा, असे दिवसातून दोन वेळा केल्यास जखमेचा डाग कमी होण्यास मदत होईल. बदामाचे तेल जखमेवर लावल्यावर त्यापासून लवकर आराम मिळेल. दिवसातून दोनवेळा हे तेल जखमेवर लावून हलका मसाज करावा.
फळे केवळ चविष्ट आहेत म्हणून ती खाण्यापेक्षा ती आरोग्यवर्धक आहेत म्हणून खावीत. यासाठी फळांमध्ये कोणते गुणधर्म आहेत, हे जाणून घ्यायला हवे, नाही का ? फायबरचे प्रमाण जास्त असलेले सफरचंद बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास ते मदत करू शकते. लोह्समृद्ध असणारे सफरचंद शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.
केळे आपल्या यकृत आणि मूत्रपिंडांना शरीरातील कचरा उत्पादने काढून टाकण्यास मदत करते. केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, म्हणूनच ते मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांसाठी उत्तम फळ आहे. ते जीवनसत्व ‘बी 6’ ने समृद्ध आहे. लाल चेरी सांधेदुखीसाठी फार उपयोगी आहे. हा त्रास असल्यास आहारात लाल चेरीचा समावेश करावा. या फळामध्ये ‘अँथोसायनीन्स’ नावाची संयुगे असतात, जी सूज कमी करण्यात मदत करतात.
कलिंगड हे भरपूर पाणी असणारे मोठ्ठे फळ आहे. त्याचा रंग आणि स्वाद पाहूनच ते खावेसे वाटते. कलिंगड पाण्याची कमतरता पूर्ण करते आणि पोट थंड ठेवते. जिममध्ये जाणाऱ्यांसाठी हे व्यायामापूर्वीचे उत्तम अन्न आहे. सर्वच फळांमध्ये आरोग्यवर्धक मात्रा असतात. म्हणून त्यांचे संतुलित प्रमाणात सेवन करायला हवे.
रिमझिम पावसाची बरसात सुरू असताना चटपटीत, पटकन होणारे गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा कुणाला नाही होणार ? त्यासाठीच तर आज बनवूया ‘ब्रेडचा उपमा’ !
साहित्य : ब्रेडचे तुकडे – ३ कप, मोहरी – २ लहान चमचे, कढीपत्ता – १ मोठा चमचा, आले चिरून – १ लहान चमचा, चिरलेला कांदा – अर्धा कप, चिरलेला लसूण – १ लहान चमचा, हळद – अर्धा लहान चमचा, टोमॅटो चिरून – १ कप, हिरवी मिरची चिरलेली – २ लहान चमचे, मिरची पावडर – १ लहान चमचा, हिरवी कोथिंबीर चिरलेली – २ चमचे, लिंबाचा रस – २ लहान चमचे, तेल – २ चमचे, मीठ – चवीनुसार.
कृती : ब्रेड उपमा बनविण्यासाठी सर्वप्रथम ब्रेडचे तुकडे करावेत. हवे असल्यास ब्रेडच्या चारही बाजू कडा कापून वेगळ्या करू शकता. आता कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडायला लागली की, त्यात कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, आले घालून परतून घ्यावे. कांदे १-२ मिनिटे परतून घेतल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो, मिरची पावडर आणि हळद घालून मिसळून घ्यावे. यानंतर २ लहान चमचे पाणी घालावे. हे मिश्रण २-३ मिनिटे शिजू द्यावे. चवीनुसार मीठ घालावे. आता हे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. आता त्यात ब्रेडचे तुकडे टाकून चांगले मिसळून मध्यम आचेवर १ मिनिट शिजवावे. यानंतर गॅस बंद करावा. वरुन कोथिंबीर घालावी. चविष्ट ‘ब्रेड उपमा’ तयार आहे. खाण्यासाठी देताना आवडत असल्यास वरुन लिंबाचा रस वापरु शकता.
तरुणपणी मनुष्याला कुणाची गरज लागत नाही, परंतु जीवनाच्या एका टप्प्यावर नाती आठवू लागतात. अलीकडे आजारांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, यात केवळ वैद्यकीय उपचार करून होत नाही, तर पूर्ण विश्रांती घ्यावी लागते. सेवा करणारी माणसे भोवताली असावी लागतात. काही वेळा मृत्यू समोर आल्याचे दिसत असते. दरम्यानचा काळ चांगला जाण्यासाठी जवळची माणसे भोवती असावी लागतात. या माणसांना त्या व्यक्तीची सेवा ही करावीच लागते. अपवाद वगळता अजूनही भारतात ही व्यवस्था चांगली आहे.
घरात अंथरुणावर असलेली आजारी व्यक्ती असल्यास वैद्यकीय उपचाराबरोबरच त्यांच्या इतर गरजांनाही प्राधान्य द्यावे. उदा. कोणी आप्तेष्ट भेटायला आले असतील तर त्यांना भेटण्याची मोकळीक द्यावी. वैद्यकीय उपचारासाठी हा आनंद हिरावू घेऊ नये. आपण त्यांना वेळ देत नसू, पण इतर कोणी आप्तेष्ट, मित्रपरिवार देत असतील तर त्यांना रोखू नये. वैद्यकीय उपचार हे केवळ पूरक असतात. त्या व्यक्तीच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे काय आहे, याची दखल आधी घेतली पाहिजे.
औषधांपेक्षासुद्धा जास्त महत्त्वाचे त्या व्यक्तीविषयी सहानुभूती आणि ममत्व असते. आपल्या आप्तेष्टांमध्ये अशी आजारी व्यक्ती असल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही ओल्या सहानुभूतीची गरज असते, हे लक्षात ठेवावे. आजारी व्यक्तीची वेळच्या वेळी स्वच्छता, त्यांना अन्न भरवणे, मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. घरात दुर्गंध पसरत असेल, तर तो टाळण्यासाठी धूप, उदबत्ती वगैरेचा उपयोग केला पाहिजे. अंथरुणावर दिवसरात्र पडून राहिल्याने व्यक्तीच्या शरीरावर जखमा होऊ शकतात. त्या वाढत जातात.
म्हणून हवेच्या किंवा पाण्याच्या गादीवर व्यक्तीला झोपवावे. दर 15 ते 20 मिनिटांनी कूस बदलल्यास रक्तप्रवाह सुरळीत ठेवला जाऊ शकतो. यासाठी प्रशिक्षित परिचारिका नसली, तर स्वत: या गोष्टी शिकून घेता येतात. स्त्रियांनीच या गोष्टी केल्या पाहिजेत असे नाही, पुरुषही हे काम करू शकतात. आहारातील पदार्थ चावून खाणे शक्य नसेल, तर पातळ पदार्थ भरवून पहावे. आजारी व्यक्तीच्या आजूबाजूला आयुष्यभर सोबत असणारी त्याच्या जवळची माणसे असली की, त्या व्यक्तीचा अंतिम काळदेखील समाधानाने जातो.
आपण कधीही वृद्ध होऊ नये, कायम तरूण दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. नेहमी तरूण, सुंदर दिसावे, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते, नाही का?अनेक अभिनेते, अभिनेत्री वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही पंचविशीत असल्यासारखे दिसत असतात. यामागे त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायाम याची महत्वाची भूमिका असते. शरीरातील सर्व क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पाणी महत्वाचे आहे.
सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्या. सकाळी १ ते २ ग्लास गरम पाणी प्यायल्याने आतडे स्वच्छ राहते. पोट साफ होण्यास मदत होते. याशिवाय आजारांचा धोका टळतो. त्वचा चमकदार राहते. थंड पाणी पिणे टाळा. उन्हाळा असो किंवा हिवाळा थंड पाणी पिऊ नका. थंड पाणी सतत प्यायल्याने मेंदू व हृदयाच्या नसांवरही परिणाम होतो. अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. जेवल्यानंतर पाणी पिऊ नका.
आयुर्वेदीक तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर लगेचच थंड पाणी पिऊ नका. जेवल्यानंतर अन्न पचविण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जर तुम्ही लगेचच पाणी प्यायलात तर जठराग्नी थंड पडतो. यामुळे अन्न पचण्याची क्रिया थंड होते. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणे उत्तम ठरते.
कायम तरूण दिसण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने नव्हे तर पाण्याने करा. याचे कारण असे की पाण्यामुळे त्वचेच्या ऊतींची भरपाई होण्यास मदत होते. रोज बदाम आणि अक्रोड खा. यामध्ये असलेले ‘ई’ जीवनसत्व त्वचेचे पोषण करते.प्रथिनयुक्त अन्न जेवा. ते खराब झालेल्या ऊतींना बरे करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते. नियमित प्राणायाम- योगासने करा.
‘अ’ जीवनसत्व शरीरासाठी फार आवश्यक आहे. ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांची दृष्टी कमी होते. रातांधळेपणा होतो. हा अभाव जर खूपच असेल, तर त्यामुळे कायमचे अंधत्वही येऊ शकते. ‘अ’ जीवनसत्वाची कमतरता असलेल्या मुलांमध्ये अंधत्व एकदम येत नाही. निदान लवकर झाल्यास ‘अ’ जीवनसत्वाने समृध्द असा आहार देऊनही समस्या दूर करता येते. भारतात ‘अ’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे दरवर्षी 30,000 मुलांची दृष्टी जाते. 1 ते 5 वर्षे वयाच्या मुलांमध्ये ही कमतरता अधिक असल्याचे दिसून येते.
यामुळे रातांधळेपणासुद्धा येतो. मुलांना कमी उजेड असताना किंवा अंधारात काही दिसत नाही. ही लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच उपचार न केल्यास ही स्थिती कायमच्या अंधत्वात रुपांतरित होऊ शकते.
यासाठी ‘अ’ जीवनसत्व भरपूर असलेले अन्न सेवन करावे. दूध, अंडी, मासे, तेल यात ‘अ’ जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. पालेभाज्या, हिरव्या भाज्या, गाजर, पपई, आंबा ही फळे ‘अ’ जीवनसत्वाने समृध्द असतात.
कुपोषणामुळे मुले खूपच अशक्त असतात. प्रारंभिक टप्प्यात मुलांना अतिसार होतो. त्यांची त्वचा कोरडी होते. उष्मांक, जीवनसत्व आणि प्रथिने यांनी समृद्ध असलेला पोषक आहार मुलांना पुरेशा प्रमाणात दिला पाहिजे. गर्भवती महिलांनी ‘अ’ जीवनसत्व असलेले पोषक अन्न घ्यावे. त्यामुळे गर्भाला आईकडून ते मिळण्यात मदत होते. वाढीच्या वयातील मुलांना पोषक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.
साहित्य : १ वाटी बेसन, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी लांब चिरलेला कांदा, 2 लहान चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा मिरची पावडर, अर्धा लहान चमचा धणे-जिरेपूड, पाव लहान चमचा हळद, पाव लहान चमचा हिंग, तेल.
कृती : कांदे उभे चिरून घ्यावेत. आता त्यात तांदळाचे पीठ, बेसन आणि मीठ घालून मिसळून घ्यावे. त्यावर एक झाकण ठेवून 30 मिनिटे झाकून ठेवावेत. असे केल्याने कांद्याने सोडलेले पाणी बेसन आणि तांदळाच्या पिठात शोषले जाते. आता बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि सर्व मसाले घालून मिसळून घ्यावे. जर ते खूप कोरडे वाटत असेल, तर 2-3 चमचे पाणी घालावे. पीठ तयार आहे. तेल गरम करत ठेवावे. नंतर त्यात थोडे-थोडे मिश्रण घालून भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावी. आता कांदा भजी तयार आहे. ती गरमागरम चहासोबत खाण्यास द्यावीत.
आपल्या मुलांशी सख्य जोडण्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत. आपल्या मुलासाठी काही वेळ राखून ठेवा. त्यांना वेळ द्या. ती निश्चितच आनंदी होतील आणि तुम्हालाही आनंद,समाधान मिळेल. मुलांसोबत खेळण्याची सवय करून घ्या. मोकळ्या वेळातील आराम सोडून त्यावेळी मुलांसोबत खेळा. मुलांना काय खेळायचे आहे ते विचारा. हे नियमितपणे केले पाहिजे. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करा.
सकाळी उठल्यावर मुलांना जवळ घ्या. तो किंवा ती तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे सहजपणे बोलून जा. रात्री झोपण्यापूर्वी मुलांशी 10 मिनिटे बोला. तिला किंवा त्याला त्यांच्या दिवसाबद्दल विचारा. त्यांचेही एक विश्व आहे, हे लक्षात असू द्या. आजच्या काळात त्याला काय आवडते आणि काय नाही हे त्याच्याकडून जाणून घ्या. आपल्या मुलांसोबत आपण एक मूल व्हा. धावा, विनोद सांगा, मजेदार गाणी गा, गोष्ट सांगा आणि मोठ्याने हसा. यामुळे तुमचाही उत्साह वाढेल आणि तुम्ही मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवाल.
दिवसातून किमान 3 वेळा मुलांच्या चांगल्या कृत्यांची स्तुती करा. परंतु ही स्तुती अनावश्यक नसावी. त्याला सकारात्मक प्रतिक्रिया देत रहा.तुमच्या मुलांसोबत संगीत ऐका किंवा गाणी गा.दिवसातून किमान 10 मिनिटे तुमच्या मुलांसोबत बाहेर जा. खरेदी करा.जेवताना मुलांजवळ बसा. तुमच्या मुलांना पुस्तके द्या. त्यांच्यासोबत तुम्ही देखील वाचा. आपल्या जवळ बसवा. मिठीत घ्या.
आपल्या मांडीवर बसवून कथा आणि कविता वाचून दाखवा. तुमच्या मुलांना घरातील छोट्या छोट्या कामांबद्दल शिकवा. हे केवळ तुम्हाला मदत करेल असे नाही, तर जबाबदारीची जाणीव देखील देईल. मुलांच्या चुकांना कधीही पोटात ठेऊन फाजील लाड करू नका. त्यांना वेळीच चूक समजून सांगा. फक्त त्याच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
मेथीदाण्यात फॉलिक अॅसिड, जीवनसत्व ए, सी आणि के यासारख्या पोषकतत्वांचा समावेश असून केसांची वाढ आणि केसांशी संबंधित समस्यांवर ती गुणकारी ठरतात. मेथीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. जे शरीराला आतून आणि केसांना बाहेरून पोषण प्रदान करतात.
केसांच्या समस्यांमधून सुटका मिळण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा हे प्रत्येकाला माहीत नसते. केस गळती होत असेल तर मेथी दाण्याचे फायदे होतात. २ चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्यानंतर भिजलेले मेथी दाणे त्याच पाण्याचा वापर करून मिक्सरमधून वाटून बारीक करून घ्यावे. हे वाटण केसांना लावावे. साधारण २० मिनिटे तसेच ठेवून त्यानंतर शाम्पूने धुवावेत. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून २ वेळा याचा वापर करावा.
कोंड्यासाठी मेथी दाण्याचा अधिक चांगला वापर करता येऊ शकतो. याकरिता दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी बारीक करून घ्यावेत. त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा. हे मिश्रण केसांना लावावे आणि ३० मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर केस शाम्पूने धुवावेत. असे केल्याने कोंडा लवकर निघून जाईल. केसांना मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठीही मेथी दाण्याचा उपयोग करता येतो. तसेच यामुळे केसगळतीही थांबते.
केसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी एक चमचा मेथीचे वाटण आणि १ चमचा नारळाचे दूध मिसळून घ्यावे. हे मिश्रण केसांना मुळापासून लावावे. मिश्रण लावताना बोटांचा वापर करावा.२० मिनिटे तसेच ठेवून मग थंड पाणी आणि शाम्पूने धुवावेत. मेथीतील लोह रक्तप्रवाह चांगला ठेवते आणि केसांची वाढ होण्यास तसेच केस अधिक सुंदर आणि मजबूत होण्यास मदत करते. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी आहारामध्येही याचा समावेश करू शकता. मेथी दाण्याचे पाणी पिणेही सोयीस्कर ठरते. हे उपचार वैद्यकीय सल्ल्याने करणे योग्य आहे.
बदललेली जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे लोकांमध्ये वजनवाढीची समस्या दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंग करू लागले आहेत. डाएटिंगचे शरीरावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. डाएटिंगमुळे शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचते.
व्यक्ती पुरेसे अन्न खात नाही, उपाशी राहते त्यावेळेस शरीराला ऊर्जा मिळत नाही. थकवा येतो. अशक्तपणा जाणवू लागतो. बहुतांश लोकांच्या स्वभावात चिडचिडेपणा येतो. रक्तातील साखरेची पातळीही कमी होते. स्नायूंमध्ये सैलपणा येऊन शरीराचा आकार बिघडू शकतो. पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. पचनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अनेकदा उलट परिणाम दिसू लागतो. व्यक्तीचे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते.
त्यामुळे डाएटिंग करताना वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करावे. शरीरास पोषक असणारे कोणते पदार्थ आहारात घ्यावेत, हे विचारून त्याप्रमाणे आहार ठेवावा. योगासने करावीत. प्राणायाम करावा. सकाळ-संध्याकाळी मोकळ्या हवेत चालण्यास जावे. शरीराची हालचाल ठेवावी.
हा केरळचा प्रसिद्ध पदार्थ आहे. साहित्य : कोहळा – 1 मध्यम (याला केरळमध्ये ‘कुंबलंग’ म्हणतात.), भोपळ्याचे तुकडे – 1 कप, हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापलेल्या) – 6, नारळाचे दूध – 1 कप, लाल चवळी – शिजवलेली पाव कप (याला केरळमध्ये ‘वान पायर’ म्हणतात.), वालाचे दाणे आवडीनुसार, कढीपत्ता, मीठ, खोबरेल तेल – 3 चमचे.
कृती कढईत शिजवलेली लाल चवळी घ्या. त्यात कोहळा आणि भोपळ्याचे चौकोनी तुकडे घाला. यात वालाचे दाणे आणि हिरव्या मिरच्या घाला. थोडे ढवळून त्यात थोडे पाणी घाला. भांडे झाकून पाच मिनिटांपर्यंत शिजू द्या. झाकण काढा. हळुवार ढवळा. आता मीठ आणि कढीपत्ता घाला. थोडे ढवळा. यात नारळाचे दूध घालून चांगले मिसळा. थोडे तेल घाला. पुन्हा ढवळा. आस्वाद घेण्यासाठी ‘ओलन’ तयार आहे.
एखाद्या मेजवानीमध्ये, महाविद्यालयामध्ये तुम्हाला कधी एखादी मुलगी आवडते. तुम्हाला तिच्यासोबत बोलायची इच्छा असते पण, हिंमतच होत नाही. मुलींशी काय बोलावे? कसे बोलावे समजत नाही? मग चिंता करू नका. तुम्हाला जर एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी मैत्री कशी करावी याविषयी एक हितगुज ! कोणत्याही मुलीसोबत बोलण्यास सुरुवात करण्याआधी पहिल्यांदा तिची आवड जाणून घेणे योग्य ठरेल. मुलींना त्यांच्याबाबतच्या सर्व गोष्टी मुलांनी लक्षात ठेवायला हवे, असे वाटत असते. त्यामुळे कोणीतरी त्यांचा विचार करीत आहे, याची जाणीव होते. प्रत्येक मुलीविषयी मनात चिरंतन आदर व सन्मान असू द्या.
मैत्री हलकीफुलकी आनंदी ठेवण्याचा दृष्टीकोन ठेवा. कोणत्याही मुलीसोबत बोलण्याची सुरूवात करताना ‘हॅलो’ म्हणा. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन ‘हॅलो’ म्हणा. स्वत:चे नाव सांगा आणि मुलीस तिचे नाव विचारा, तुम्हाला हे शक्य नसेल तर काही काम किंवा एखादा प्रश्न विचारून तुम्ही बोलायला सुरुवात करू शकता. तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीच्या मुलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न करता तेव्हा स्वत:ची ओळख गमावू नका. मुलींना खोट्या पद्धतीने वागणारी मुले अजिबात आवडत नाहीत. तुम्ही जर खूप पादर्शन मांडलेत, तर मुली तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात.
मुलींना प्रश्न विचारून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. खोटी प्रशंसा करू नका. कोणत्याही मुलीसोबत मैत्री करण्यापूर्वी तिला तुमच्यामध्ये रुची आहे की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. तुमचे बोलणे तिला आवडते का याचा अंदाज घ्या. जेव्हा मुलगी तुमच्यासोबत सुरक्षित असेल तेव्हाच तुमची मैत्री होईल. त्यानंतर तुम्ही तिच्या कुटंबाबाबत जाणून घेऊ शकता; आणि आपल्या कुटुंबाबाबत बोलू शकता.
दरवर्षी २० मार्च हा दिवस ‘जागतिक दंत आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी या दिवसाची संकल्पना ‘तुमच्या तोंडाचा अभिमान बाळगा’ अशी आहे. दातांच्या समस्यांबद्दल बोलायचे झाले तर दात पिवळे पडणे, हिरड्या दुखणे, दातदुखी आणि दात कमकुवत होणे अशा अनेक समस्या खूप त्रास देतात.
आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने आपण आपले दात पांढरे आणि चमकदार बनवू शकता. वडाच्या फांदीचा वापर आपण दात साफ करण्यासाठी देखील करू शकता. वडाची मुळे तुरट असतात, जी केवळ दात पांढरे करीत नाहीत, तर दात आणि हिरड्यांचे आरोग्य देखील सुधारतात. तुळशीचा अनेक प्रकारे आपण वापर करू शकतो. हा उपाय करण्यासाठी तुळशीची पाने सुकवून त्याची भुकटी बनवावी. ही भुकटी दात घासण्यासाठी वापरावी. तुळशीची हिरवी पाने दातांची स्वच्छता सुधारतात, आणि दात पांढरे होतात. हे ‘पायोरिया’ सारख्या दंत समस्यांवर देखील उपचार करू शकते.
पांढरे निरोगी दात मिळविण्यासाठी कडुलिंब हा पारंपरिक उपाय आहे. कडुलिंबाच्या फांद्या आजही अनेक भारतीय ‘टूथब्रश’ म्हणून वापरतात. कडुलिंबाच्या तेलामध्ये तुरट आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी रोखतात, दातांमधील जंतू नष्ट करतात. दात पांढरे करण्यासाठी आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्रिफळा वापरू शकता. त्यामुळे तोंडाचे व्रण कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी त्रिफळा पाण्यात उकळवा. थंड होऊ द्या. कोमट झाल्यावर या पाण्याने दात स्वच्छ धुवा.
अलीकडे हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात कडधान्य असणे खूप महत्त्वाचे आहे. रोजच्या आहारात गव्हापासून बनविलेली लापशी ते नाचणी, बाजरी यासारख्या गोष्टींचा समावेश करा. ब्रेड आणि पास्ता खाणे पूर्णपणे टाळा. धान्यांमध्ये फायबर तसेच खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ते कोलेस्ट्रॉल, रक्दाब नियंत्रित करतात. खाण्यामध्ये जवस असू द्या. जवस खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. दररोज सुमारे 4 चमचे जवसाच्या बिया खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होतो.
बदाम, शेंगदाणे, अक्रोड हे पदार्थ आहारात असावेत. यांच्यात ‘अनसॅच्युरेटेड फॅट’ असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. यातील फायबर कोलेस्ट्रॉलला रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. सोया दूध, सोया बडी यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते. अभ्यासानुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेत सोया दुधात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सोया दूधाला फुल फॅट दुधाऐवजी घेतले जाऊ शकते. अर्थात, हे प्रयोग वैद्यकीय सल्ल्यानुसार करावेत.
कृती : एका कढईत थोडे तेल गरम करा. त्यात खोवलेले खोबरे घालून तांबूस होईपर्यंत परता. आता मेथी घालून परतत रहा. धणे पावडर, लाल तिखट, ठेचलेली मिरी आणि हळद घाला. चांगले परता. लहान कांदे घालून पुन्हा परता. या सगळ्याचे वाटण बनवा आणि बाजूला ठेवा.
दुसरी कढई घेऊन त्यात 2 चमचे तेल गरम करा. यात वांग्याचे तुकडे आणि चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्या. भांडे झाकून थोडा वेळ मंद आचेवर ठेवा. आता झाकण काढून थोडे ढवळून घ्या. पुन्हा झाकण ठेवून थोडा वेळ शिजवा. थोड्या वेळाने पुन्हा झाकण काढून चिंचेचे पाणी घाला. सुरुवातीला केलेले वाटण घाला. त्याला उकळी येऊ द्या. यात थोडॆ पाणी घाला. हळूवार ढवळून घ्या. चवीनुसार मीठ घाला. पुन्हा ढवळा. आता या ‘तीयल’ साठी फोडणी तयार करा. थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घाला. ही फोडणी ‘तीयल’ वर घालून गरमागरम वाढा.
भाऊ आणि बहिणीचे नाते सर्वात मौल्यवान आहे. या नात्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकीसोबतच आदराची भावना असणे आवश्यक आहे. अनेकवेळा कळत-नकळत कुटुंबातील वातावरण बिघडून जाते. हे सुंदर नाते कटुतेने भरू लागते. जर भाऊ-बहिणींमध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना नसेल, तर ते एकमेकांचे महत्त्व तितक्या गांभीर्याने समजत नाहीत. म्हणूनच लहानपणापासूनच काही सवयी भाऊ-बहिणीत रुजवायला हव्यात. या सवयी अंगीकारून ते या नात्याचा आदर तर वाढवतीलच; शिवाय इतरांसाठी प्रेरणाही बनतील.
‘ताई’ किंवा ‘दादा’ बोलण्याची सवय लावा. मुले नेहमी मोठ्यांचे अनुकरण करतात. अनेक घरांमध्ये असे घडते की, घरातील वडिलधारी मंडळी, मुलांना ज्या नावाने हाक देतात, तेच नाव घेण्याची सवय मुलांना लागते.
तुलना टाळण्याची सवय लावा. घरात दोन मुले असतील तर त्यांची तुलना करणेही घातक ठरू शकते. देखावा, अभ्यास, खेळ यांची कोणतीही तुलना चुकीची आहे. प्रत्येक मूल वेगळे असते, आणि प्रौढांनी हे समजून घेतले पाहिजे. तुलना केल्यास लहानपणापासूनच एखाद्या व्यक्तीमध्ये न्यूनगंड, निराशा आणि राग यासारख्या भावना घर करु शकतात. त्यामुळे भाऊ-बहिणीचे नाते बिघडते. मोठे झाल्यावरही कधी-कधी त्यांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होतो. मुलांना एकमेकांच्या चांगल्या गोष्टींबद्दल सांगा. एकमेकांकडून चांगल्या गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करा.
कामाच्या वाटपात समानता ठेवा. मुलगा असेल तर तो घरची कामे करणार नाही; आणि मुलगी असेल तर बाहेरचे काम करायला जाणार नाही. या भेदभावामुळे भावंडांमध्ये संघर्ष आणि लैंगिक असमानता निर्माण होऊ शकते. विशेषत: आजच्या वातावरणात जेव्हा मुले केवळ शहरातूनच नव्हे, तर देशाबाहेरही अभ्यास आणि नोकरीसाठी जातात, तेव्हा त्यांना आवश्यक ती सर्व कामे शिकवणे अधिक महत्त्वाचे होते. मुलाने कणीक भिजवणे असो; किंवा मुलीला गाडीची ‘स्टेफनी’ बदलायला शिकवणे असो, हे काम त्यांच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरेल. त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल. थकून घरी आलेल्या भावाला एक ग्लास पाणी देण्याची सवय तुम्ही बहिणीला लावत असाल तर तीच सवय भावालाही लावा.
प्रेम सारखेच असावे. अनेक घरांमध्ये असे घडते की, मुलीचे लग्न होऊन ती दुसऱ्या घरात जाईल, म्हणून तिला अतिरिक्त सुविधा देऊन तिचे लाड केले जातात. यासाठी भावाला गैरसोय सहन करावी लागली तरी चालेल. दुसरीकडे, अविवाहित भावांना जेव्हा मुलगी लग्नानंतर तिच्या माहेरच्या घरी येते तेव्हा त्यांच्या दिनचर्येशी आणि सोयी-सुविधांसह सर्व प्रकारची तडजोड करण्यास सांगितले जाते. या परिस्थितीमुळे भावंडांमधील अंतर वाढू शकते. मुले एक-दोनदा तडजोडही करतात; पण जेव्हा ही परिस्थिती पुन्हा-पुन्हा उद्भवते, तेव्हा मनात कटुता येऊ लागते. त्यामुळे लहानपणापासूनच दोन्ही मुलांमध्ये समान प्रेमाची सवय लावा. तुमचे प्रेम दोघांसाठी समान आहे, हे त्यांना समजावून सांगा. ज्या काही सुविधा आहेत, त्या दोघांसाठी समान असाव्यात हेही लक्षात ठेवा.
रक्षाबंधन-भाऊबीज यासारख्या सणांचे महत्व समजावून सांगा. सण हे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक भावनांशी निगडित नसतात. सण माणसाची विचारसरणी, सर्जनशीलता, अभिव्यक्ती तसेच व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता आणतात. आजच्या धावपळीच्या जीवनात मानवी मूल्यांचा अभाव ही एक मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचे तसेच भाऊबीज या सारख्या सणांचे महत्त्व मुलांना समजावून सांगा. त्यांना सांगा की हा सण केवळ रक्ताच्या नात्याशी जोडलेला नाही तर मानवी मूल्यांशीही जोडलेला आहे. यामध्ये सुरक्षेची आणि नातेसंबंधांची जबाबदारी दोन्ही भावंडांना बरोबरीने पार पाडावी लागते. ही भावना लहानपणापासून मुलांमध्ये ठेवली तर मोठी झाल्यावरही ही भावना मनात ठेवून ते एकमेकांशी जोडले जातील.
हात आणि बोटे सुंदर दिसण्यासाठी महिला नखांवर रंग (नेलपेंट) लावतात. नखांना रंग देऊन सजविण्याचे अनेक प्रकार आजकाल बाजारात दिसतात. निरनिराळ्या प्रकारच्या रंगांचे आजकाल नखांवर प्रयोग केले जातात; मात्र बऱ्याच वेळेस हे रंग चुकीच्या पद्धतीने लावण्यामुळे नखांचे सौंदर्य बिघडते; कारण या रंगांमध्ये हानिकारक रसायने असतात.
नखांना अशा पद्धतीने सजविताना काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत. नखावरचा जुना रंग काढून नवीन रंग देताना आधीचा रंग पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. बऱ्याचजणींना वेळ नसल्याने आहे त्या रंगावरच त्या रंग देतात. असे करणे नखांसाठी मुळीच चांगले नाही. त्यामुळे नखांचे पोषण होत नाही. यासाठी नखे नेहमी ‘रिमूव्हर’ने स्वच्छ करून घ्यावीत; आणि मगच नवीन रंगाचा साज द्यावा.
नखावरील रंग काढण्यासाठी नेहमी चांगल्या ‘रिमूव्हर’चा वापर करावा. जर नखांवरील रंग नखांनीच खरडून काढलात तर यामुळे नखांवर ओरखडे उठतात. नखांचे सौंदर्य खराब होतेच; पण नखांची वाढही खुंटते. नखे कायम निरोगी राहण्यासाठी ही चूक कधीच करू नका. नखांना रंग लावल्यानंतर कमीत कमी अर्धा तास कोणतेही काम करू नका. जरी आपला रंग लगेच वाळला तरीही काही मिनिटे हात तसेच ठेवावेत. असे न केल्यास रंग व्यवस्थित वाळत नाही, आणि मग नखांमध्ये आणि त्यांच्याखाली असणाऱ्या कोशिकांमध्ये पसरतो. रंगामधील रसायने नखे आणि कोशिकांचे नुकसान करतात. यासाठी रंग सुकण्याची वाट पहा.
तांदूळ हे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट असलेले महत्त्वाचे धान्य आहे. हे जरी खरे असले, तरी पांढरा तांदूळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषासमान मानला जातो. पांढऱ्या तांदूळामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह हा असा आजार आहे, ज्यामध्ये भरपूर आहार टाळावा लागतो.
मधुमेहींकरिता एक भात असा आहे, जो तुम्ही बिनदिक्कत ते खाऊ शकतात, तो म्हणजे ‘काळा तांदूळ’ ! ‘काळा तांदूळ’ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ कमी आहे. एवढेच नाही तर काळ्या तांदळात प्रथिने, लोह, अँटीऑक्सिडंट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि आहारात भात आवडत असेल, तर तुम्ही काळा तांदूळ निवडू शकता. तो तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू देणार नाही. तुमच्या हृदयाच्या आरोग्याची देखील काळजी घेईल. काळा तांदूळ कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. म्हणूनच आहारात काळ्या तांदूळाचा नक्कीच समावेश करा. अनेकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते. जर आपणास ही समस्या असेल, तर आजपासूनच काळ्या तांदूळाचे सेवन सुरू करा. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल आणि पचनाशी संबंधित इतर समस्याही दूर होण्यास मदत होईल.