
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या ‘लाडकी बहीण’ या शब्दाची मोठी चर्चा आहे. याच शब्दाचे महत्त्व आणि त्यामागच्या भावना अधोरेखित करणारा ‘लाडकी बहीण’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला असून, येत्या १५ मे २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून एका सामान्य कुटुंबातील बहिणीचा संघर्ष, तिचे हळवे भावविश्व आणि त्यासोबत गुंफलेली राजकीय तसेच सामाजिक पार्श्वभूमी असा हा चित्रपट अतिशय रंजक असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर असे प्रकर्षाने जाणवते की, हा केवळ एक कौटुंबिक चित्रपट नसून तो आजच्या काळातील महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा एक धाडसी प्रयत्न आहे. चित्रपटाच्या केंद्रस्थानी एक अशी बहीण आहे, जी आपल्या भावासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी कोणत्याही संकटाचा सामना करण्यास तयार आहे. ट्रेलरमध्ये ग्रामीण भागातील वास्तव, तिथले राजकारण आणि सामान्य माणसाची होणारी ओढाताण यांचे उत्तम चित्रण करण्यात आले आहे.
‘माझी लाडकी बहीण’ ही योजना केवळ कागदावर मर्यादित न राहता, ती लोकांच्या जगण्याशी आणि भावनांशी कशी घट्ट जोडली गेली आहे, याचे अनेक पदर या चित्रपटाच्या निमित्ताने उलगडले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. सामाजिक जबाबदारीचे भान राखत मनोरंजनाचा डोस देण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी यात केल्याचे दिसते.
या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील कसदार अभिनेत्री स्मिता तांबे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यांच्यासोबतच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, उषा नाईक, सुरेखा कुडची आणि शीतल शिंदे यांसारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अशी दुहेरी जबाबदारी शीतल शिंदे यांनी समर्थपणे पेलली आहे. शनिदेव फिल्म्स यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली असून, गणेश शिंदे यांनी या चित्रपटाचे लेखन, पटकथा आणि संवादांची धुरा सांभाळली आहे. तर शेखर माटे हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.
हा चित्रपट म्हणजे भावना, नाती आणि संघर्षाचा एक प्रवास असून तो चित्रपटगृहात जाऊन पाहणे ही प्रत्येक मराठी प्रेक्षकासाठी एक वेगळी आणि हृदयस्पर्शी अनुभूती असेल. बहिणीचे प्रेम आणि भावाची साथ हे मराठी माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय असल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारेल, अशी खात्री व्यक्त होत आहे.