सुवर्णगणेश मंदिर

रायगड जिल्ह्यातील सुवर्णगणेश मंदिर भाविकांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहे.   अलिबागपासून साधारण ७५ किमी अंतरावर दिवेआगर येथे आहे. मुळातच दिवेआगर हे ठिकाण निसर्गरम्य व कुणालाही प्रेमात ओढेल इतके सुंदर आहे. सुवर्णगणेश मंदिराने हे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
या मंदिरामागील इतिहास रोमहर्षक आहे. या मंदिराजवळील नारळाच्या बागेत जमिनीखाली एक तांब्याची पेटी आढळली. त्या पेटीत सोन्याची गणपतीची मूर्ती व गणपतीचे दागिने होते. या मूर्तीचे वजन सुमारे १ किलोपेक्षाही अधिक होते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही सुवर्णगणेश मूर्ती अंदाजे ३०० ते ४०० वर्षे प्राचीन असावी.

ही अलिकडची गोष्ट आहे.  दिनांक 17 नोव्हेंबर, 1997 रोजी संकष्टी चतुर्थीचा विशेष दिवस होता. शेतीसाठी जमीन नांगरत असताना नारळाच्या रूपातील एक तांब्याची पेटी आढळली. ही पेटी प्राचीन दिसत होती. त्यात जुन्या संस्कृतमधून काही लिहिलेले होते. या बातमीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.  दुपारी 12 वाजता ही पेटी सर्वांसमक्ष उघडण्यात आली. या पेटीत श्रीगणेशाचे सोन्याचे दागिने व शुद्ध सोन्यापासून बनविलेली गणपतीची मूर्ती होती. त्यामुळे दया मूर्तीचे नाव ‘सुवर्ण गणेश’ असे ठेवण्यात आले.

या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. दुर्दैवाने सन २०१२ साली ही मूर्ती चोरट्यांनी चोरून नेली.  नंतर मंदिरात सध्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.  या मंदिरातील वातावरण अतिशय शांत असून परिसर स्वच्छ आहे. येथे स्वच्छ समुद्रकिनारा असून गणेश दर्शनानंतर पर्यटक येथे निवांत वेळ घालवू शकतात. यामुळे संपूर्ण दिवस आनंददायी आणि शांततेत जाईल, यात शंकाच नाही.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,890 वेळा पाहिलं