नाशिकचे कपालेश्वर महादेव मंदिर

नाशिक शहरातील प्रसिद्ध ‘पंचवटी’ परिसरात गोदावरीच्या काठी ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. येथे भगवान शिव वास करीत होते, असे पुराणात म्हटले आहे. भगवान शंकरासमोर नंदी नसणारे हे देशातील पहिले मंदिर आहे.

या मंदिराला खूप महत्त्व आहे. या मंदिराचे निर्माण बारा ज्योतिर्लिंगानंतर असल्याचे मानले जाते. या टेकडीवर पूर्वी भगवान शंकराची पिंडी होती, मात्र आता तेथे मोठे मंदिर आहे. पेशव्यांच्या कार्यकाळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या पायऱ्या उतरताच समोर ‘गोदावरी’ नदी वाहताना दिसते. त्यातच प्रसिद्ध ‘राम कुंड’ आहे.

या कुंडात भगवान श्रीरामांनी आपले वडील राजा दशरथ यांचे श्राद्ध केले होते. याशिवाय या संकुलात अनेक मंदिरे आहेत. कपालेश्वर मंदिरासमोर गोदावरी नदीच्या पलीकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे. वर्षातून एकदा येथे ‘हरिहर महोत्सव’ होतो.

त्यावेळी ‘कपालेश्वर’ आणि ‘सुंदर नारायण’ या दोघांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात. तिथे त्यांची एकमेकांशी भेट घडवून अभिषेक केला जातो. याशिवाय महाशिवरात्रीला कपालेश्वर मंदिरात मोठा उत्सव असतो. श्रावण महिन्याच्या सोमवारी येथे मोठी गर्दी असते. पर्यटकसुद्धा येथे आवर्जून येतात.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
924 वेळा पाहिलं