सिंधुदुर्गातील निवती किनारा

सिंधुदुर्गातील निवती हा एक अप्रतिम समुद्रकिनारा आहे. कुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी तसेच माडा-पोफळीच्या सहवासात असलेल्या ‘निवती’ या गावाकडील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो.

येथे डॉल्फिन माशांना बघण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची रेलचेल असते. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाची छान छायाचित्रे मिळतात. येथे गेल्यावर निवती व भोगवे या दोन समुद्र किनाऱ्यांच्या मध्ये असलेल्या एका डोंगरावर बांधलेला ‘किल्ले निवती’ पाहून मन हरखून जाते. आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ चे मानांकन मिळालेला हा शुभ्र वाळूचा किनारा पहायला सर्वात योग्य जागा म्हणजे ‘किल्ले निवती’चा उत्तरेकडे असलेला बुरुज होय. तेथून हा किनारा फार मनोहर दिसतो.

निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात अतिजवळून ‘डॉल्फिन’ माशाच्या झुंडी पाहता येतात. यांत्रिकी होड्यांमधून समुद्रसफर करत डॉल्फिनचे नृत्य पाहण्याचा आनंदही अनुभवता येतो. उंच उड्या मारत जलविहार करणारे डॉल्फिन पाहणे पर्यटकांसाठी आनंदी ठरते. पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा असणारे बीच रिसॉर्टही येथे आहे. अथांग पसरलेला सागर, निळेशार पाणी, किनाऱ्यावरील स्वच्छता आणि अर्थातच येथे येताच छत्रपती शिवरायांची होणारे स्मरण यामुळे या किनाऱ्याकडे पर्यटक वळतात.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
734 वेळा पाहिलं