सायबर कॅफे व्यवसाय
जागतिकीकरणानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती झाली. सर्व कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला संगणक आणि इंटरनेटची गरज जाणवू लागली. ‘डिजीटल इंडिया’च्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. अशावेळी इंटरनेटची सोय प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असणे ही मानवाची मूलभूत गरज बनू लागली आहे. सायबर कॅफेमध्ये एकाच वेळी असंख्य संगणक इंटरनेटच्या सुविधेसह उपलब्ध असतात. या सुविधेचा वापर कोणीही कितीही वेळ करू शकते. ही सेवा वापरण्यासाठी तासाप्रमाणे रक्कम ठरलेली असते.
एकूण ४ प्रकारची सायबर कॅफे आपल्याला पाहायला मिळतात. ‘इंटरनेट कॅफे’ जिथे इंटरनेटची सेवा पुरविली जाते. जिचा वापर करून आपण आपले काम करू शकतो, खेळ खेळू शकतो, चित्रपट पाहू शकतो. ‘गेमिंग सायबर कॅफे’ यामध्ये फक्त ऑनलाइन किंवा ऑफलाइन संगणकीय खेळ खेळायला मिळतात. ‘सायबर कॅफे’ हे सुसज्ज असे इंटरनेट कॅफे आहे. येथे ऑनलाइन इंटरनेट सेवा, प्रिंटींग, फॅक्स, अल्बम मिक्सिंग, लॅमिनेशन यांसह इतर अन्य सॉफ्टवेअरही आपण वापरू शकतो. येथे वापरकर्त्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात. जागतिक पातळीवर सायबर कॅफे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालवला जातो. जरी प्रत्येकाच्या घरी इंटरनेटच्या सोयी – सुविधा उपलब्ध असल्या, तरी बऱ्याचदा अनेक मंडळी कामासाठी सायबर कॅफेचा पर्याय निवडताना दिसतात.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातूनही परवानगी आवश्यक असते. सायबर कॅफेसाठी एक ‘युनिक सायबर कॅफे आयडी’ दिला जातो. त्याचप्रमाणे सायबर कॅफे चालवणारी व्यक्ती ही डिजीटल पेमेंट, पॅन कार्ड पोर्टल, रेल्वे तिकीट पोर्टल, आधार कार्ड पोर्टल, नोकरभरतीचा प्रवेश अर्ज यांसारख्या सुविधाही अधिकृत नोंदणी परवान्याने राबवू शकते. संगणक, इंटरनेट, टेबल, खुर्ची, एसी, प्रिंटर यांसह इतर आवश्यक गोष्टी बघितल्यास किमान १००० स्वे. फूटांची जागा आणि किमान १० लाख रुपये गुंतवणूक हा व्यवसाय सुरू करण्यास आवश्यक ठरते. जेणेकरून एका वेळी अनेक मंडळी आपल्या सायबर कॅफेचा लाभ घेऊ शकतील