
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने गोव्यात तीन दिवसांची कार्यशाळा मालिका आयोजित करण्यात आली. ही शिबिरे दिनांक ११ जून ते १३ जून २०२५ या कालावधीत विविध ठिकाणी पार पडली. या उपक्रमाचे आयोजन कॉग्निफ्लक्स प्रशिक्षण आणि सल्लागार संस्था यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांपासून ते उद्योजक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी यांचाही समावेश होता. एकूण पंधराशेहून अधिक व्यक्तींनी सहभाग नोंदवला.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शारदा मंदिर हायस्कूल, एसएस डेम्पो महाविद्यालय, आणि मुस्टिफुंड हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र घेण्यात आले. त्यामध्ये सामान्य सायबर शिस्त, संकेतशब्द व्यवस्थापन, ओळख चोरीपासून संरक्षण, आणि समाजमाध्यमांवरील सावधगिरी यावर भर दिला गेला.
कदंबा, वाळपई व डोणा पॉल परिसरातील कार्यक्रमांमध्ये औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहभागी करून सायबर धोके ओळखणे, सुरक्षित ई-मेल व्यवहार, व संस्थात्मक संरक्षण प्रणाली यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशासकीय व धोरणात्मक पातळीवरील चर्चासत्र उच्चपदस्थ अधिकारी, संस्थाचालक आणि प्रशासकीय प्रमुख यांच्यासोबत सायबर धोरणांची आखणी, माहिती सुरक्षेसाठी कृती आराखडा, आणि देशपातळीवरील नियमावली यांचा आढावा घेण्यात आला.
संस्थेचे संस्थापक मनोज पाटील यांनी सांगितले की, “सायबर जागरूकता ही काळाची गरज आहे. डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीने मूलभूत सायबर शिस्त आत्मसात केली पाहिजे. गोव्यात नागरिक, विद्यार्थी आणि उद्योगजगत यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद हा या चळवळीला दिशा देणारा आहे.”