कापडी स्लिंग पर्स बनवण्याचा व्यवसाय
कापडी स्लिंग पर्स आजच्या महिलांची आवडती वस्तू आहे. बाजारात किंवा जवळच्या ठिकाणीच नाही लग्नसमारंभासारख्या कार्यक्रमांना जाताना मोबाईल, पैसे, चावी अशा वस्तू ठेवण्यासाठी स्लिंग पर्सना पसंती देतात. आपल्या खांद्यात अडकवून डाव्या किंवा उजव्या हाताकडे वळणाऱ्या या पर्स कुठेही वावरताना सहज वापरता येतात. प्लास्टिक, चामडी किंवा रेक्झीनच्या पर्सऐवजी साध्या सुती कापडावर किंवा रेशमी कापडावर विविध नक्षीकाम केलेल्या स्लिंग पर्सना खूप मागणी आहे. कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि घरातूनही चालवता येणारा हा एक उत्तम लघुउद्योग ठरू शकतो.
या व्यवसायासाठी मुख्य कच्चामाल म्हणजे कापड. यासाठी कापूस कापड, ज्यूट, कॅनव्हास किंवा डेनिम कापड वापरले जाते. त्याशिवाय धागा, झिप, बटणे, हुक, पर्ससाठी लांब पट्टा, अस्तर कापड, फोम यांची गरज असते. सजावटीसाठी मणी, लेस, प्रिंटिंग रंग किंवा भरतकाम साहित्य वापरले जाऊ शकते. सुरुवातीला साधारण दहा ते पंधरा हजार रुपयांमध्ये कच्चामाल खरेदी करून छोट्या प्रमाणात उत्पादन सुरू करता येते.
हा व्यवसाय घरातूनही सुरू करता येतो. सुरुवातीला सुमारे शंभर ते दीडशे चौरस फूट जागा पुरेशी असते. यासाठी एक साधे शिवणयंत्र, कापड कापण्यासाठी कात्री, मोजपट्टी, टेबल आणि इस्त्री यांची आवश्यकता असते. उत्पादन वाढल्यावर औद्योगिक शिवणयंत्र आणि कटिंग मशीन घेता येतात.
सुरुवातीला हा व्यवसाय साधारण वीस ते पन्नास हजार रुपयांत सुरू करता येतो. यात शिवणयंत्र, कच्चामाल, काही साधने आणि थोडा साठा तयार करण्याचा खर्च येतो. जर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे असेल तर भांडवल एक ते दोन लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. कामगार ठेवायचे असल्यास त्यांचा पगारही लक्षात घ्यावा लागतो.
कापडी स्लिंग पर्सची विक्री विविध मार्गांनी करता येते. स्थानिक बाजार, साप्ताहिक बाजार, प्रदर्शन, महिला बचत गटांच्या माध्यमातून विक्री करता येते. तसेच सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करण्याची व्यवस्था असणाऱ्या संकेतस्थळांवर आपले उत्पादन दाखवून ग्राहक मिळवता येतात. स्वतःचा छोटा ब्रँड तयार करून आकर्षक डिझाइन, योग्य किंमत आणि चांगली गुणवत्ता दिल्यास व्यवसाय झपाट्याने वाढू शकतो.
एकूणच, कमी गुंतवणुकीत सुरू होणारा, सर्जनशीलता वापरणारा आणि चांगला नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. योग्य नियोजन, दर्जेदार उत्पादन आणि प्रभावी विक्री धोरण यामुळे कापडी स्लिंग पर्स बनवण्याचा उद्योग यशस्वी होऊ शकतो.