शंभू राजा – रॅपच्या अंदाजात शौर्यगाथा

छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यांचे अचाट धैर्य आजच्या आधुनिक काळात नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक झाले आहे. यासाठी ‘ब्रम्हा अधिकृत’ प्रस्तुत ‘शंभू राजा’ हे गीत तयार करण्यात आले आहे. आज हे गाणे एक नवा इतिहास घडवत आहे. २६ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याने अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले आहे. विशेषतः तरुणाईमध्ये हे गणे लोकप्रिय ठरत आहे. या गाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ऐतिहासिक पराक्रमाला रॅप संगीताच्या तालावर गुंफण्याचा केलेला धाडसी आणि यशस्वी प्रयोग. संगीतकार ब्रम्हा आणि ओमकार राज यांनी या गीताचे शब्द आणि रचना अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने केली आहे.

या गाण्यातील प्रत्येक ओळ महाराजांच्या स्वराज्याप्रती असलेल्या निष्ठेची आणि त्यांच्या बलिदानाची प्रचिती देते. पारंपारिक इतिहासाला आधुनिक संगीताची जोड दिल्याने हा जाज्वल्य वारसा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचत आहे.

या गाण्याच्या चित्रफितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांचा वावर गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून देतो. त्यांच्या आवाजातील जरब आणि सादरीकरण यामुळे इतिहासातील गांभीर्य प्रेक्षकांच्या मनावर ठसते. त्यांच्यासोबत बालकलाकार अद्विका सातपुते हिचा प्रभावी अभिनय हे या गाण्याचे मुख्य आकर्षण ठरले आहे. या गाण्यातून छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आणि त्यांचे संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे प्रवाहित होतात, याचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. मनीष महाजन यांच्या कल्पक दिग्दर्शनाखाली आणि दिलीप गांगोडे यांच्या उत्कृष्ट छायाचित्रणातून ही कलाकृती साकारली गेली आहे. विनायक लोखारे यांनी साकारलेले या गाण्याचे भित्तीपत्रक गाण्यातील भव्यतेची साक्ष देते.

गाण्याच्या तांत्रिक बाजूचा विचार केल्यास, मुंबईतील हर्ष भोईर आणि नाशिकमधील जगदीश भांदगे यांनी या गीताचे केलेले ध्वनी मुद्रण आणि संकलन अत्यंत दर्जेदार आहे. राहुल ढलकरी यांनी केलेली संगीताची मांडणी आणि सिद्धार्थ कांडलकर व ओंकार नवले यांनी दिलेले पार्श्वसंगीत गाण्यातील जोश अधिकच वाढवते. या निर्मितीमध्ये गंगा हिरेमठ, कृष्णा जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाजवलेल्या प्रत्यक्ष वाद्यांचा वापर गाण्याला अस्सल मराठमोळा आवाज देतो. निखिल भोसले यांचे नृत्य दिग्दर्शन गाण्याच्या संकल्पनेला साजेसे असून ‘स्वयंभू ढोल ताशा पथका’चे विपुल धवन यांचे लाभलेले विशेष सहकार्य गाण्यातील वीररस अधिक गडद करते.

या गाण्याने समाज माध्यमांवर लाखांहून अधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. औरंगजेबाच्या जुलुमी सत्तेसमोर कधीही न झुकणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळणारे शंभूराजे या गीताच्या शब्दाशब्दांतून जिवंत होतात. इतिहासाची जपणूक आणि कला यांचा हा अनोखा संगम प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. अशाप्रकारे, ‘शंभू राजा’ हे रॅप गीत केवळ एक गाणे न राहता, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि पराक्रमाचा बुलंद आवाज बनले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
5,326 वेळा पाहिलं