
ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेला यंदा विशेष राजकीय रंग मिळाला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे तब्बल बारा वर्षांनंतर प्रथमच परिषदेत अनुपस्थित राहणार आहेत, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष ‘राज्यभोजनासाठी’ आमंत्रित करण्यात आलं आहे.
चीनी परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना “अचानक वेळापत्रकातील अडचणीमुळे” परिषदेला उपस्थित राहता येणार नाही. मात्र, अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, ही अनुपस्थिती केवळ कार्यक्रमातील अडथळा नसून, ब्रिक्स मधील भारत–चीन संबंधांमधील वाढती तणावपूर्णता आणि नेतृत्वातील स्पर्धा दर्शवते.
याउलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत असून, ब्राझील सरकारने आयोजित केलेल्या राजकीय ‘राज्यभोजनात’ मोदी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यामुळे जागतिक मंचावर भारताची वाढती भूमिका अधोरेखित होत आहे. भारत सध्या ब्रिक्स मध्ये आर्थिक व विकासात्मक धोरणांतून नेतृत्व करताना दिसत आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन देखील आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय कडून जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटमुळे ब्राझीलमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार नाहीत. ते परिषदेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.
यंदाच्या परिषदेत ब्रिक्स मध्ये नव्या सदस्य देशांचा समावेश ही चर्चेची प्रमुख बाब आहे. सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, यूएई आणि इथिओपिया हे देश नवीन सदस्य म्हणून चर्चेत आहेत. मात्र, समूहातील अंतर्गत धोरणात्मक मतभेदांमुळे एकमताने निर्णय घेणे आव्हानात्मक ठरत आहे.