लाडकी बहिण योजनेबाबत मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे अनुदान देण्यात येते. मात्र जून महिन्याचा हप्ता अद्याप बऱ्याच महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. परिणामी, अनेक लाभार्थी महिला संभ्रमात असून सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत आहेत. याआधी दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता जमा होत होता, परंतु यावेळी विलंब झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे.

अधिकृतपणे सरकारकडून यावर कोणतीही घोषणा झालेली नसली, तरी प्रशासनातील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जून आणि जुलैचे हप्ते एकत्र म्हणजेच तीन हजार रूपये एकाच वेळी दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्य सरकारकडून लाभार्थ्यांची यादी पुन्हा तपासली जात असून, काहींना अपात्र ठरवले गेले आहे. त्यामुळे काही महिलांना हप्ता न मिळाल्याचे कारण पात्रतेशी संबंधित असण्याची शक्यता आहे.

या योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी शासनाने आयकर विभागाच्या डेटाबेसचा वापर करून पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी पुन्हा तपासण्याचे काम सुरू केले आहे. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा करदात्यांनी चुकीने लाभ घेतल्याचे समोर आल्याने त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाणार नाहीत. तसेच योजनेच्या पारदर्शकतेसाठी लाभार्थ्यांचे आधार आणि उत्पन्न तपशील पडताळले जात आहेत.