मुंबईच्या डबेवाल्यांकडून मासिक दरवाढ जाहीर

मुंबईतील डबेवाल्यांनी डबा पोहोचविण्याच्या सेवेसाठी घेतले जाणारे मासिक शुल्क वाढवले आहे. जुलै महिन्यापासून ही दरवाढ लागू करण्यात आली असून, दरमहा सरासरी दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. वाढत्या महागाईचा आणि इंधन खर्चाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
आतापर्यंत एका ग्राहकाकडून मासिक एक हजार दोनशे रुपये शुल्क आकारले जात होते. आता ते एक हजार चारशे रुपये इतके झाले आहे. डब्बेवाले ज्या भागातून डबे उचलतात व जिथे पोहोचवतात त्या दोन्ही ठिकाणांतील अंतर पाच किलोमीटरपेक्षा अधिक असेल, तर त्या प्रमाणात अधिक तीनशे ते चारशे रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत इंधन, रेल्वे पास, कपडे आणि उपकरणे यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. डब्बेवाले आपली सेवा वेळेवर आणि अचूक पोहोचवतात, पण वाढत्या खर्चामुळे जुन्या दरात सेवा देणे आता शक्य नाही. त्यामुळे काही प्रमाणात दरवाढ करावी लागली.
दरवाढीनंतरही ग्राहकांकडून फारशी नाराजी व्यक्त झालेली नाही. कारण डब्बेवाल्यांची सेवा ही मुंबईच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शंभर टक्के वेळेवर सेवा देणाऱ्या या यंत्रणेवर कार्यालयीन नोकरदारांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे ही दरवाढ ग्राहकांनी समजून घेतली आहे.
दरम्यान, डब्बेवाले आषाढी वारीनिमित्त सात जुलै रोजी सेवा बंद ठेवणार आहेत. पंढरपूरच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी ते पाच जुलै रोजी मुंबईहून प्रस्थान करतील आणि आठ जुलैपासून पुन्हा सेवा पूर्ववत सुरू होईल, असे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.