धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पहिली यादी जाहीर

देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीपैकी एक असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पात महत्त्वाची घडामोड घडली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की धारावीत राहणाऱ्या सर्व रहिवासी पात्र आहेत आणि कोणालाही बेघर केले जाणार नाही. मात्र, पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत न दिल्यास संबंधित कुटुंब अपात्र ठरू शकते. शासनाच्या धोरणानुसार, ‘कोणीही वंचित राहू नये’ हा उद्देश असून, पात्रतेसाठी टप्प्याटप्प्याने यादी प्रसिद्ध केली जात आहे.
प्रसिद्ध झालेली पहिली यादी सेक्टर सहा भागातील आहे. या भागातील एकूण पाचशे पाच झोपड्यांपैकी सुमारे पंच्याहत्तर टक्के झोपडधारक पात्र ठरले आहेत. त्यापैकी एकतीस झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांनी अद्याप कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत, तर एकशे सत्ततीस प्रकरणांची पडताळणी महानगरपालिका करत आहे. याशिवाय अठ्ठेचाळीस झोपड्या सार्वजनिक वापराच्या जागांमध्ये मोडतात. उर्वरित दोनशे एकोणनव्वद झोपड्या पात्र ठरल्या असून, सत्तर कुटुंबांची कागदपत्रे तपासणीच्या प्रक्रियेत आहेत.
या योजनेअंतर्गत एक जानेवारी दोन हजारपूर्वी धारावीत वास्तव्यास आलेल्या कुटुंबांना तीनशे पन्नास चौरस फूट क्षेत्रफळाचे घर विनामूल्य मिळणार आहे, तेही धारावीतच. तर दोन हजार ते दोन हजार अकरा दरम्यान धारावीत स्थायिक झालेल्यांना तीनशे चौरस फूटाचे घर धारावीच्या बाहेर देण्यात येईल, मात्र त्यासाठी अडीच लाख रुपये शुल्क आकारले जाईल. दोन मजली किंवा त्याहून अधिक उंचीच्या झोपड्यांतील रहिवाशांनाही संधी देण्यात येणार असून, त्यांना बारा वर्षे भाडे तत्वावर राहिल्यानंतर त्या घराचे मालकी हक्क प्रदान केले जातील.
पात्र व्यावसायिकांना धारावीतच व्यावसायिक वापरासाठी मोफत जागा देण्यात येणार आहे. तर अपात्र व्यावसायिकांसाठी प्रत्येक नव्या पुनर्वसन सोसायटीत दहा टक्के जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे घराबरोबरच रोजगाराच्या स्थैर्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे.
ज्यांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांनी पाच जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आवश्यक कागदपत्रे धारावी पुनर्विकास प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष किंवा [email protected] या ईमेल पत्त्यावर पाठवावीत. अन्यथा संबंधित कुटुंबे योजनेतून वगळली जातील. हा प्रकल्प केवळ पुनर्वसनाचा नाही, तर गोरगरिबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा ऐतिहासिक टप्पा आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्यासाठी वेळेत कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे.