दिल्लीहून वॉशिंग्टनकडे जाणारी एअर इंडिया विमानसेवा रद्द

एअर इंडियाची दिल्लीहून वॉशिंग्टनकडे जाणारी एआय-१०३ ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा विएन्ना येथे तांत्रिक बिघाडामुळे थांबवण्यात आली. यानंतर या विमानाची देखभाल दुरुस्ती प्रक्रियेसाठी वेळ लागणार असल्याने ही सेवा रद्द करण्यात आली. परिणामी, वॉशिंग्टनहून दिल्लीकडे येणारी परतीची एआय-१०४ सेवा देखील रद्द करण्यात आली आहे.

या विमानाने इंधन भरण्यासाठी विएन्ना येथे नियोजित थांबा घेतला होता. मात्र, तांत्रिक तपासणीत काही त्रुटी आढळून आल्यामुळे वैमानिकांनी सुरक्षा लक्षात घेऊन पुढील प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियाने प्रवाशांना याची माहिती देत हॉटेल सुविधा, पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था किंवा तिकिटाचे परताव्याची सुविधा दिली आहे.

एअर इंडियाकडून यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, आम्ही दिलेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. प्रवाशांना आवश्यक सर्व सोयी पुरवल्या जातील.” कंपनीने हेही स्पष्ट केले की, विमानाची देखभाल प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

गेल्या काही महिन्यांपासून एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यापूर्वी देखील दिल्ली–विएन्ना आणि अहमदाबाद–लंडन विमानसेवांमध्ये अशाच घटना घडल्या होत्या. त्यामुळे एअर इंडियाच्या देखभाल यंत्रणेवर आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून देखील कंपनीच्या विमाने आणि देखभाल प्रक्रियेची चौकशी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याने, एअर इंडियाने आता अधिक काटेकोर उपाययोजना करणे गरजेचे ठरणार आहे.







18,568