रेल्वेचा नवा निर्णय – लोअर बर्थ ठरावीक प्रवाशांसाठी राखीव

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेतील लोअर बर्थ आता सर्व प्रवाशांसाठी खुली राहणार नाही. यापुढे ही सुविधा फक्त विशिष्ट प्रवासी गटांनाच प्राधान्याने देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

रेल्वेच्या नव्या नियमानुसार, लोअर बर्थ आता साठ वर्षांवरील पुरुष प्रवासी, अठ्ठावन्न वर्षांवरील महिला प्रवासी, तसेच दिव्यांग आणि एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना प्राधान्याने दिले जातील. या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रत्येक प्रकारच्या कोचमध्ये लोअर बर्थची विशिष्ट संख्या असते. उदाहरणार्थ, स्लीपर कोचमध्ये सात, थर्ड एसीमध्ये पाच, तर सेकंड एसीमध्ये चार लोअर बर्थ राखीव ठेवण्यात आले आहेत. विशेषतः दिव्यांगांसाठीही काही लोअर बर्थ कायम राखीव ठेवण्यात आले असून, त्यांच्या तिकिटावर स्पष्टपणे त्याचा उल्लेख केला जाईल.

तिकीट आरक्षणाच्या वेळी जर गरजू प्रवाशाला लोअर बर्थ मिळाली नसेल, आणि प्रवासादरम्यान काही लोअर बर्थ रिकामी राहिल्या असतील, तर त्या प्राधान्याने वरील प्रवाशांनाच दिल्या जातील. यामुळे वरिष्ठ व विशेष प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

लोअर बर्थच्या संख्येवर मर्यादा असल्यामुळे, प्रत्येक प्रवाशाला ती जागा मिळेलच याची हमी नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग व्यक्तींना शक्य तितके प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी आरक्षण करताना हे लक्षात घेऊन जागेची निवड करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







12,683