न्हावीगड किल्ला

नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथून दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात होते. या सह्याद्रीच्या रांगेला ‘सेलबारी’ आणि ‘डोलबारी’ रांग असे म्हणतात. ‘सेलबारी’ रांगेवर ‘न्हावीगड’ हा किल्ला आहे. या किल्ल्याला ‘रतनगड’ असेदेखील म्हणतात. इसवी सन १४३१ मध्ये अहमदशहा बहमानी व गुजरातचा सुलतान यांच्या सैन्यात न्हावीगडाच्या पायथ्याशी मोठे युध्द झाले होते, असा उल्लेख आढळतो. पुढील काळात शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा गड होता. पायथ्याशी पाताळवाडी हे गाव आहे. तेथून न्हावीगड दक्षिणोत्तर पसरलेला दिसतो. गडावर जाण्याची वाट गडाच्या उत्तरेकडून आहे.

गडाच्या पायथ्याशी एका लाकडी पट्टीवर सूर्य,चंद्र,वाघ,नाग कोरलेले आहेत. बाजूला काही शिळा पडलेल्या आहेत. येथे काही भगवे झेंडे लावले आहेत. गड चढायला सुरुवात केल्यावर कातळावर सप्तश्रृंगी देवीचे शिल्प कोरलेले दिसते. या मंदिराच्या दोनही बाजूंना बुजलेली पाण्याची टाकी आहेत. देवीचे मंदिर पाहून परत चढायला सुरुवात केल्यावर एक बुरुज मिळतो. येथे कातळात कोरलेली ४ पाण्याची टाकी आहेत. पुढचा मार्ग दोन उद्ध्वस्त बुरुजांच्या मधील पायर्‍यांवरुन जातो. थोडे चढून गेल्यावर गडावर जाणार्‍या पायर्‍या लागतात. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर प्रथम एक मोठे चौकोनी टाक लागते. त्याच्या पुढे उध्वस्त वाड्याचे अवशेष दिसतात.

वाड्याच्या मागे पुन्हा उद्ध्वस्त घराचे काही अवशेष दिसतात. गडाच्या दक्षिणेला एक सुळका आहे. तो चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्यक आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. या गडावरुन पूर्वेला तांबोळ्या, मांगीतुंगी तर दक्षिणेला मुल्हेर, मोरागड, हरगड, साल्हेर आणि सालोटा हा परिसर दिसतो. दरम्यान, गडावर चढण्यासाठी असणाऱ्या पायऱ्यांवर माती साचलेली असल्याने जपून चढावे लागते. न्हावीगडावर जाण्यासाठी नाशिक-सटाणा मार्गे ताहाराबादला जावे लागते. ताहाराबादपासून ७ किमीवर मांगीतुंगी आहे. येथून वडाखेलला जावे. न्हावीगडाच्या पायथ्याच्या पाताळवाडी आहे. वडाखेल ते पाताळवाडी हे चालत अंतर अर्ध्या तासाचे आहे. पाताळवाडीतून सरळ वाट किल्ल्याच्या पठारावर गेलेली आहे. ताहाराबादहून वडाखेलपर्यंत रिक्षा भाड्याने घेऊन जाता येते.







19,920