
भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत लवकरच अधिक पारदर्शकता आणली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, न्यायालयीन नियुक्ती ही केवळ गुणवत्ता आणि पात्रतेवर आधारित असेल आणि कोणत्याही प्रकारच्या बाह्य हस्तक्षेपाला स्थान दिले जाणार नाही. मुंबईतील बॉम्बे बार असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केले की, गुणवत्ता ही न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सर्वात महत्त्वाची अट असेल. मात्र, समाजातील सर्व घटकांचा समावेश होईल, याचीही काळजी घेण्यात येईल. विविधता आणि प्रतिनिधित्व या मूल्यांनाही न्यायालयीन यंत्रणेत महत्त्व आहे, असे त्यांनी नमूद केले.
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी काही दिवसांपूर्वी नागपूर येथे न्यायाधीशांच्या नियुक्तीत बाह्य हस्तक्षेप होत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर अप्रत्यक्षपणे उत्तर देताना गवई यांनी सांगितले की, जर अशा बाबी घडत असतील, तर त्या थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
सरन्यायाधीशांनी यावेळी माहिती दिली की, पुढील काही दिवसांत उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रिया वेगाने पार पडणार आहे. एका आठवड्यात पंचेचाळीस न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली असून, त्यामध्ये बॉम्बे उच्च न्यायालयासाठी दोन न्यायाधीशांचा समावेश आहे.