सोमवार पेठेत वनविभागाची मोठी कारवाई

पुणे शहरातील सोमवार पेठ परिसरात वनविभागाने अवैध वन्यजीव व्यापारावर मोठी कारवाई करत सुमारे साडेचारशे किलो मोरपिसे जप्त केली आहेत. या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील अकरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत करण्यात आली असून, ही मोरपिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती मानली जात आहे.
वनविभागाच्या गुप्त माहितीच्या आधारे नरपतगिरी चौक परिसरात सापळा रचण्यात आला होता. संशयित आरोपी मोरपिसांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत सर्व आरोपींना रंगेहात पकडले. यावेळी त्यांच्या ताब्यातून सुमारे चारशे ते पाचशे किलो मोरपिसे हस्तगत करण्यात आली.
भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे पिसे विक्री करणे हे कायद्याने गुन्हा आहे. वन्यजीव अधिनियम, १९७२ नुसार मोर किंवा त्याच्या कोणत्याही अवयवांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणे बेकायदेशीर आहे. यामुळेच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर गुन्हा नोंदवून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पुण्यातील अशा प्रकारच्या वन्यजीव तस्करीवर अटकाव घालण्यासाठी वनविभाग सातत्याने गुप्त मोहीम राबवत आहे. या कारवाईमुळे पुणे शहरात अवैध मोरपिस विक्रीस मोठा दणका बसला आहे. या कारवाईमुळे वन्यजीव संरक्षणाबाबत सजगता निर्माण झाली असून, विभागाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते आणि सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, जप्त करण्यात आलेल्या मोरपिसांची तपासणी व वर्गवारी करण्यात येणार आहे.