अनेर धरण अभयारण्य

महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अनेर धरण अभयारण्य आहे. अनेर धरण अभयारण्य नाशिक प्रशासकीय विभागात येते. अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे ८३ चौ. कि. मी. क्षेत्रात हे वसलेले आहे. सातपुडा समृद्ध आणि दुर्मीळ अशा वनराईचे दर्शन या अभयारण्यात होते. पूर्णा, तापी नद्यांच्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवताळ झुडूपे असल्यामुळे अनेक तृणभक्षीय प्राणी येथे आढळतात. शिरपूरपासून 16 कि.मी अंतरावर मुंबई-आग्रा रस्त्याला लागून हे अभयारण्य आहे. येथे साग, अंजन, पळसाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. ‘अरूणावती’ नदीच्या पाणलोट क्षेत्रानजीकचे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने सन 1986 मध्ये ‘अनेर डॅम वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित केले.

शुष्क पानगळीच्या आणि खुरट्या काटेरी वनांसाठी हे अभयारण्य ओळखले जाते. या अभयारण्यात ‘हरियाल’ देखील आढळते. या अभयारण्यातील ‘कडरागड’ येथे अखंड दगडात कोरलेल्या गुंफा आपले लक्ष वेधून घेतात. अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी सप्टेंबर ते फेब्रुवारी असा आहे. धुळे येथून शिरपूर येथे जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बस सेवा उपलब्ध आहे. नक्षत्र वन, चिरंजीव वनही पाहण्यासारखे आहे. पर्यटकांसाठी नौकांची सुविधाही उपलब्ध आहे. येथील बगीचा मनोहर आहे. येथे नौकानयनची सुविधा आहे. येथून सुर्यास्ताचे होणारे दर्शन विलोभनीय असते.

या अभयारण्यात प्रामुख्याने बाभूळ, हेंकळ, चिंच, मोहा, आवळा, साग, अंजन, पळस, धावडा, आपटा, सलई या वृक्ष प्रजाती आढळतात. जैवविविधतेने संपन्न असा हा प्रदेश आहे. कोल्हा, भेकर, खार, मोर, चिंकारा, सुगरण, कोकिळा, घुबड, ससा, तित्तर, बटेर, गिधाड, सुतारपक्षी, मैना, मुंगूस, कोब्रा, सायाळ, घोरपड, मन्यार, सरडा, लांडगा, अस्वल, हॉर्नबिल, पानकोंबडी, रानडुक्कर, बगळे, तडस अशा प्राणी व पक्ष्यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी येथे मोठ्या संख्येने पाहण्यास मिळतात.







18,940