
‘आरंबोल’ हे उत्तर गोव्यातील ‘पेडणे’ या प्रशासकीय प्रदेशातील एक पारंपरिक मच्छिमार गाव आहे. हे गाव गोव्याची राजधानी पणजीच्या उत्तरेस 24.6 किमी अंतरावर आहे. या गावातील समुद्रकिनारा फार सुंदर आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटकांना तो आकर्षित करतो. गोव्यातील ‘आरंबोल’ समुद्रकिनारा देश-विदेशातील पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्धीस पावलेला आहे. गोव्याच्या उत्तर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. यालाच ‘हरमल किनारा’ असेही म्हणतात. या किनाऱ्याच्या एका बाजूला ‘केरी’ किंवा ‘क्वेरिम’ समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूला ‘मोरजीम’ समुद्रकिनारा आहे. ‘अरंबोल’ किनारा हा खडकाळ आणि वालुकामय आहे.
या समुद्रकिनाऱ्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. येथे किनाऱ्यावर योग वर्ग घेतले जातात. मसाज करणारी मंडळी येथे असतात. येथून सूर्यास्ताचे विहंगम दृश्य नेत्रांनी टिपता येते. पॅराग्लाइड करणे, अन्य जलक्रीडा, कड्यावरून उडी मारणे असे अनेक उपक्रम येथे उपलब्ध असतात. गोव्यातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. ‘आरंबोल’ पणजीपासून 55 किमी अंतरावर आहे. याला विदेशी लोकांनी पसंती दिली आहे. हा किनारा 2.5 किमीपर्यंत पसरलेला आहे. गोव्याच्या इतर समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत ‘आरंबोल’चे व्यावसायिकीकरण कमी झाले आहे.
या समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेले जंगल हे एक आकर्षण आहे. येथे अनेक प्रजातींचे वन्यजीव आहेत. पर्यटक या समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग आणि इतर जलक्रीडांचा आनंद घेऊ शकतात. ‘डॉल्फिन स्पॉटिंग’ हा एक लोकप्रिय प्रकार आहे. येथे मध्यम श्रेणीची हॉटेल्स आणि लॉज आढळू शकतात.
‘आरंबोल’चा वर्षातील सर्वात उष्ण महिने साधारणतः मार्च ते मे असतात. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, मे आणि डिसेंबर हे सर्वाधिक सूर्यप्रकाशित महिने आहेत. या गावातील मिरची या पिकास ‘जीआय’ मानांकन मिळालेले आहे. हरमलची मिरची विशेष प्रसिद्ध आहे. गोव्यातील सर्वच किनारे विशेषतः विदेशी पर्यटकांचे आकर्षण असते. त्यातही उत्तर गोव्यातील हा किनारा अनेक वर्षांपासून विदेशी पर्यटकांना आकर्षित करतो. या किनाऱ्यावर व्यावसायिकदृष्ट्या मोठे असे विशेष काही नसले तरीही या किनाऱ्याच्या निसर्गसुंदरतेमुळे येथे पर्यटक असतात.