
केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी साखर उद्योगाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवण्याबरोबरच त्याच्या खरेदी दरातही वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले की, साखर कारखान्यांना वर्षभर उत्पन्न मिळावे यासाठी इथेनॉल उत्पादनास अधिक चालना देण्यात येणार आहे. यामुळे कारखाने फक्त हंगामापुरते न राहता, बारा महिने कार्यरत राहतील आणि त्यातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होईल.
इथेनॉलचा वापर इंधनात मिसळण्यासाठी होत असल्याने, या धोरणामुळे परकीय तेलावर अवलंबन कमी होईल. त्यामुळे देशाच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लागेल, असेही मंत्री जोशी यांनी नमूद केले. त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीनेही इथेनॉलचा वापर फायदेशीर आहे. इथेनॉलसाठी ऊसाचा वापर वाढल्यामुळे, शेतकऱ्यांना ऊसाचे अधिक दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ऊसाचे वेळेत आणि संपूर्ण खरेदी होणार असल्याने, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
केंद्र सरकार लवकरच इथेनॉलच्या दरवाढीबाबत आणि मिश्रणाच्या प्रमाणात वाढीबाबत अधिकृत घोषणा करणार आहे. यासाठी संबंधित विभागांशी सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले.