संगणक प्रशिक्षण उद्योग
संगणक प्रशिक्षण केंद्र (कॉम्प्युटर प्रशिक्षण संस्था) हा महाराष्ट्रातील तरुणांसाठी चांगला लघुउद्योग मानला जातो. आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात संगणकाचे ज्ञान आवश्यक असल्यामुळे या व्यवसायाला सतत मागणी असते.
संगणक प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना संगणक वापरणे, विविध सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण आणि डिजिटल कौशल्ये शिकवली जातात. शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, नोकरी शोधणारे युवक तसेच शासकीय परीक्षांची तयारी करणारे उमेदवार या प्रशिक्षणासाठी येतात.
यात मूलभूत संगणक प्रशिक्षण म्हणजे मराठी व इंग्रजी टंकलेखन, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइण्ट सादरीकरण असे कार्यालयीन संगणक अभ्यासक्रम, ग्राफिक डिझाइन, डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण, संगणक हार्डवेअर आणि दुरुस्ती असे अभ्यासक्रम घेता येतील.
यासाठी सुरुवातीला काही साधनांची आवश्यकता लागेल. किमान पाच –सहा संगणक, टेबल-खुर्च्या आणि वीज व्यवस्था, प्रिंटर आणि प्रिंट घेण्यासाठी कागद, आवश्यकता वाटल्यास प्रक्षेपक किंवा मोठा पडदा आणि अर्थात संगणक प्रशिक्षण देणारा प्रशिक्षक. हे प्रशिक्षण जर तुम्हीच देणार असाल तर उत्तम.
हा व्यवसाय साधारण दोन ते पाच लाख रुपये गुंतवणुकीत सुरू करता येतो. जागा स्वतःची असल्यास खर्च कमी होतो. भाड्याने जागा घेतल्यास खर्च थोडा वाढू शकतो.
प्रत्येक विद्यार्थ्याकडून अभ्यासक्रमानुसार किमान दोन हजार ते दहा हजार रुपये शुल्क घेतले जाते. जर एका महिन्यात वीस ते तीस विद्यार्थी प्रवेश घेत असतील तर चांगले उत्पन्न मिळू शकते.
यासाठी परवाने व नोंदणीची आवश्यकता लागेल. त्यात उद्यम नोंदणी, आवश्यक असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना लागेल. एमएचसीईटी सारख्या काही अभ्यासक्रमांसाठी शासकीय किंवा मान्यताप्राप्त संस्थेची मान्यता अल्गेल.
याशिवाय योग्य प्रशिक्षण, चांगली जाहिरात आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन केल्यास संगणक प्रशिक्षण केंद्र हा स्थिर आणि दीर्घकालीन व्यवसाय ठरू शकतो.