
महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेचे लाभार्थी असलेल्या महिलांसाठी आता सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. यामार्फत महिलांना अल्प व्याजदरात कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन, या लाभार्थी महिलांसाठी सहकारी पतसंस्था कार्यरत केली जाणार आहे. यामुळे या महिलांना किरकोळ व्यवसाय, उद्योग वा कौटुंबिक गरजांसाठी अत्यल्प व्याजदरावर कर्ज मिळू शकेल.
या पतसंस्थेसाठी महिलांची नोंदणी, भागभांडवल जमा करणे, संचालन मंडळ स्थापन करणे अशा प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या या उपक्रमामुळे महिलांच्या हातात आर्थिक साधनं येतील आणि त्यांचे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न साकार होईल.
जिल्ह्यातील विविध भागांतून ‘लाडकी बहिण’ योजनेचे अर्ज मोठ्या संख्येने प्राप्त होत आहेत. अशा लाभार्थी महिलांची एकत्रित नोंद घेऊन त्यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. याद्वारे महिलांनी शिल्लक निधी योग्य पद्धतीने गुंतवणूक करून आपल्या कुटुंबासाठी उत्पन्नाचा नवा मार्ग शोधावा, हा सरकारचा उद्देश आहे.
या संदर्भात लवकरच मार्गदर्शन शिबिरे व कार्यशाळा आयोजित केल्या जाणार असून, बँक अधिकारी, सहकार क्षेत्रातील जाणकार मार्गदर्शक उपस्थित राहतील. ‘लाडकी बहिण’ योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता, ती महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पुढील पायऱ्या चढत आहे.