वांग्याची लागवड

‘वांगी’ पिकाची लागवड वर्षभर खरीप आणि रब्बी हंगामात व अगदी उन्हाळ्यातही करता येते. कोरडवाहू शेतीत, तर कधी मिश्रपीक म्हणूनही वांग्याची लागवड करतात. पांढरी वांगी मधुमेही व्यक्तींसाठी गुणकारी असतात. वांग्यामध्ये खनिजे, ‘अ’,‘ब’, ‘क’ ही जीवनसत्त्वे; तसेच लोह, प्रथिने यांचे पुरेसे प्रमाण पुरेसे असते. महाराष्ट्रात अंदाजे 28, 113 हेक्टरी क्षेत्र वांगी लागवडीखाली आहे.
वांगी पिकाला पाऊस आणि पावसाळी हवामान मानवत नाही. कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये वांग्याची वाढ चांगली होते. सरासरी 13 ते 21 सेल्सिअस तापमानामध्ये वांग्याचे पीक चांगले येते.
सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक घेता येते. ‘मांजरी गोटा’, ‘वैशाली’, ‘प्रगती’, ‘अरूणा’ या वांग्याच्या जाती आहेत. सुपीक आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या मध्यम काळया जमिनीमध्ये वांग्याचे झाड जोमाने वाढते. त्याचप्रमाणे नदीकाठच्या गाळसदृश जमिनीत वांग्याचे उत्पादन चांगले येते. मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन नांगरून भुसभुशीत करावी. दर हेक्टरी 30 – 50 गाडया शेणखत जमिनीत मिसळावे. वांग्याच्या शेतीतील खुरपणी करून तण काढणे, कोळपणी करणे, पिकाला भर देणे ही कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे, तसेच झाडाला मातीची भर द्यावी. काही तणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारुनही करता येतो. वांगी पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पालक, मेथी, कोथिंबीर इ. पालेभाज्या घेता येतात.
वांग्याच्या पिकावर मर, शेंडा आणि फळे पोखरणारी अळी, तुडतुडे, मावा या किड व रोगांचा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी वेळोवेळी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.रोप लावणीनंतर अंदाजे 10 ते 12 आठवडयांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चमकत असतानाच काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट होते. तसेच जुन झालेली फळे गिऱ्हाईकांकडून नाकारली जातात. 4 ते 5 दिवसांच्या अंतराने 10 ते 12 वेळा वांग्याची तोडणी करता येते. वांग्याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते. जाती परत्वे वांग्याचे सरासरी हेक्टरी उत्पादन 100 ते 250 क्विंटल पर्यंत येते.