सोलापूरमध्ये वारकरी संशोधन केंद्राची मागणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने वारकरी संप्रदायासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. या प्रस्तावानुसार, सोलापूर जिल्ह्यात “वारकरी संप्रदाय आंतरराष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण केंद्र” स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पाचशे एकर जमीन आणि पुढील पाच वर्षांसाठी दोनशे एकाहत्तर कोटी सहाशे लाख रुपयांचा निधी लागणार असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे.

या प्रकल्पासाठी सर्वाधिक खर्च म्हणजे सुमारे दोनशे नऊ कोटी सत्तर लाख रुपये केवळ भूखंड खरेदीसाठी होणार आहे. उर्वरित साठ कोटी रुपयांहून अधिक निधी इमारती, अभ्यासकक्ष, वसतिगृहे, संत साहित्य संग्रहालय, कर्मचारी निवास व अन्य सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे. प्रस्तावास विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाची मान्यता मिळाली असून तो जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यलयाकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला आहे.

या संशोधन केंद्रामार्फत संत परंपरा, अभंग साहित्य, कीर्तन-भजन व वारकऱ्यांचे जीवनतत्त्वज्ञान यावर प्रमाणित अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहेत. प्रमाणपत्र, पदविका व पदवी अभ्यासक्रमांची रचना करण्यात येणार असून नव्या पिढीला वारकरी परंपरेचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येईल. त्यामुळे वारकरी सांस्कृतिक परंपरेचा जागतिक पातळीवर प्रचार आणि प्रसार घडवून आणता येईल.

दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीसाठी निघतात. अशा मोठ्या प्रमाणातील जनतेच्या व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध अभ्यास केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल. दिंड्या, रिंगण, पालखी सोहळे, आरोग्य सेवा, अपघात व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रण यावरील संशोधनास प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, अध्यात्म, मानसिक आरोग्य, आहार आणि पर्यावरण यांमधील परस्पर संबंधांवरही अभ्यास केला जाणार आहे.

या केंद्रात आधुनिक ग्रंथालय, संग्रहालय, प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्र आणि शिक्षक-विद्यार्थी निवास असे अनेक विभाग असतील. त्यामुळे संत साहित्याचे दस्तऐवजीकरण, संशोधन व जतन करता येणार आहे. सोलापूर जिल्हा वारकरी संप्रदायासाठी एक शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून पुढे येईल, अशी अपेक्षा विद्यापीठाने व्यक्त केली आहे. शासनाने लवकरात लवकर यास मान्यता द्यावी, अशी मागणी होत आहे.







17,779