पाकिस्तानच्या लष्करी सरावादरम्यान ड्रोन उद्ध्वस्त

पाकिस्तानच्या सियालकोट जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आकाशात उडणारा एक ड्रोन भारतीय समजून खाली पाडला. मात्र, चौकशीअंती समोर आलं की तो ड्रोन कोणताही भारतीय नव्हता, तर तो तुर्की आणि पाकिस्तानने संयुक्तपणे विकसित केलेला ‘यीहा-३’ लष्करी ड्रोन होता. ही घटना पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेसाठी मोठी लज्जास्पद ठरली आहे.

शेतकरी सूफयान याने या ड्रोनला पाहताच भारताचा हेर ड्रोन असल्याचा संशय घेतला आणि गोळी झाडून तो पाडला. स्थानिक संरक्षण दलानेही प्रथम त्याचे कौतुक करत त्याला ‘राष्ट्रभक्त’ म्हटलं. परंतु संरक्षण मंत्रालयाच्या चौकशीनंतर उघड झालं की, तो ड्रोन पाकिस्तानच्या लष्करी सरावाचा भाग होता, आणि त्या दिवशी तो परिसरात सरावासाठी उडवण्यात आला होता.

‘यीहा-३’ हा लष्करी ड्रोन तुर्कीच्या तंत्रज्ञानावर आधारित असून त्यात क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. याप्रकरणामुळे केवळ शेतकऱ्याची चूक नव्हे, तर स्थानिक लष्करी यंत्रणांची समन्वयाची अडचण आणि नागरिकांना योग्य माहिती न देण्याची त्रुटीही समोर आली आहे.

या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण विश्लेषकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. शेतकऱ्याची गोळी लागून स्वतःचाच लाखोंच्या किंमतीचा लष्करी ड्रोन उद्ध्वस्त झाल्यामुळे पाकिस्तान सरकारची विश्वासार्हता आणि युद्धसज्जतेविषयीचे दावे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.