भारतीय लष्कराची स्वदेशी ड्रोनकडे वाटचाल

भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशात संरक्षणविषयक स्वदेशी उत्पादनाला प्रचंड गती मिळत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या निर्णयानुसार, लष्कराने स्वदेशी कंपन्यांकडून दोनशे पंचाण्णव कोटी रुपयांची ड्रोन खरेदी केली आहे. ही ऑर्डर नागास्त्र‑एक आर आणि स्विच ड्रोन सारख्या विविध युद्धसज्ज यंत्रणांसाठी आहे.

नागपूरस्थित सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीला एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे. तर आयडिया फोर्ज टेक्नोलॉजीज या मुंबईस्थित कंपनीला एकशे सत्तावन्न कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर पूर्णतः स्वदेशी बनावटीच्या आणि लष्करी गरजांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ड्रोन यंत्रणांबाबत आहे.

या निर्णयामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना मिळाली असून, भारत भविष्यातील ड्रोन शक्ती म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्वार्म ड्रोन, काउंटर ड्रोन प्रणाली, दृश्य थेट नियंत्रण प्रणाली, आणि विविध स्वयंचलित यंत्रणा विकसित करण्यात येणार आहेत.

२०३० पर्यंत भारतीय ड्रोन उद्योगाची बाजारपेठ अंदाजे अकरा अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. देशांतर्गत उत्पादनामुळे केवळ संरक्षण सक्षम होत नाही, तर रोजगार निर्मिती, निर्यात आणि तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचाही मार्ग मोकळा होतो.