मलंगगड किल्ला

ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला सुमारे 15 कि.मी. अंतरावर ‘मलंगगड’ किल्ला आहे. एका उंच डोंगरावर शिलाहार राजाने हा किल्ला बांधलेला असून तो पनवेल-वरुण-वावंजे गावापासून २ कि.मी.च्या अंतरावर आहे. हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. मलंगगड हे धार्मिक स्थान आहे. ते ‘श्री मलंग’ किंवा ‘हाजी मलंग’ या नावाने ओळखले जाते. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा मान आजही हिंदूकडेच आहे. माघ पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.

रायगड जिल्ह्यातील अन्य किल्ल्याप्रमाणेच माथ्यावर अवघड सुळका आणि खाली थोडी माची आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या या किल्यावर बाबामलंग यांची समाधी आहे. किल्ल्यावर तटबंदी, प्रवेशद्वार, पाण्याची तळी, बुरुज आढळतात. किल्ल्याचा शिरोभाग तसा लहान आहे. छप्पर उडालेले, भिंती शाबूत असलेला एक वाडा येथे दिसतो. त्याच्या मागे खोदलेल्या 7 टाक्या आहेत. बालेकिल्याच्या मध्यभागी औदुंबराचे झाड आहे. श्री गणेश मंदिर असून काही ठिकाणी तटबंदीही आहे.

बालेकिल्याच्या समोरच देवणीचा सुळका आहे. येथे येणारे भाविक या समोरच्या देवणीवर एक दगड फेकून मारण्याचा सोपस्कार करतात. दगड जर देवणीवर पोहोचला तर मनातली गोष्ट साध्य होते, असे मानतात. अगदी उंचावरुन सभोवताली पाहिल्यास कुर्ला-मुंबईचा परिसर, पनवेलपर्यंतचा प्रवेश तसेच माथेरानचा प्रदेश दिसतो. कल्याण स्थानकावरुन गडाच्या पायथ्याशी बसने जाता येते. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाहून अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
538 वेळा पाहिलं