वैद्यकीय महाविद्यालये डिजिटल होणार

महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये लवकरच आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या डिजिटल प्रणालीद्वारे रुग्णांची नोंदणी, उपचार तपशील, निदान अहवाल आणि औषधोपचार यांसारखी सर्व माहिती संगणक प्रणालीत उपलब्ध राहणार आहे. यामुळे रुग्णसेवा अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होणार आहे.
एचएमआयएस प्रणाली ५ जुलै २०२२ पासून बंद होती. त्यामुळे वैद्यकीय रेकॉर्ड्स पुन्हा हाताने लिहावी लागत होती. आता ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने जवळपास बत्तीस कोटी एकवीस लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. या निधीतून इंटरनेट कनेक्टिव्हिटी, संगणकीय साधने आणि आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी “नेक्स्ट जनरेशन ई-हॉस्पिटल” सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, संगणक, बारकोड स्कॅनर, प्रिंटर, वायफाय यंत्रणा, स्टोरेज युनिट्स यांची खरेदी करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने यासाठी आवश्यक मंजुरी दिली आहे. ही यंत्रणा वापरणाऱ्यांसाठी आवश्यक प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
एचएमआयएस प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर डॉक्टरांना रुग्णाच्या सर्व वैद्यकीय इतिहासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. त्यामुळे निदान आणि उपचाराची प्रक्रिया अधिक वेगवान आणि परिणामकारक होईल. यामुळे रुग्णालयातील प्रतीक्षा वेळ कमी होईल, तसेच संशोधनासाठीही अचूक माहिती संकलित होईल.
या प्रणालीची अंमलबजावणी सुरुवातीला काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केली जाणार आहे. त्यानंतर ती सर्व शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये विस्तारली जाईल. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.