नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य विलोभनीय आहे. पक्षी निरीक्षकांना मनासारखी दृश्ये टिपता यावीत, म्हणून वन विभागाने येथे खास निर्मिती केली आहे. या परिसरात पक्ष्यांना बसण्यासाठी लाकडी दगडी उंचवटे निर्माण केले आहेत. नांदूरमधमेश्वर हे ठिकाण नाशिक-निफाड रस्त्यावर आहे. सन १९८२ मध्ये ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी नांदूर मधमेश्वरला भेट दिली. त्यावेळी हे ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ असल्याचे उद्गार त्यांनी काढले. हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्याची विनंती केली. पुढे सन १९८६ मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला.

या अभयारण्यात स्पूनबिल, कॉमन क्रेन, फ्लेमिंगो, डक, यांसारख्या विविधरंगी विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य असते. कडवा व गोदावरी नदीच्या संगमावर नांदूरमधमेश्वरला एक धरण बांधले आहे. येथील जलाशय या पक्ष्यांची तहान भागवितो. ओरियन्टल, हनी बझार्ड, इंडियन रोलर, किंग फिशर, पाईड किंगफिशर, मार्शल हेरियर, स्पूनबिल, कुट, कॉमन टिल, पिग्मीगुस, ग्रेटर फ्लेमिंगो, कॉमन क्रेन, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, इंडियन सिलव्हर बिल, ग्रीन बिटर, लॅपविंग, व्हाईट नेक्ड स्टॉर्क, ओपन बिल स्टॉर्क, व्हिललिंग डक, मलार्ड पोचार्ड, गढवाल, नॉर्दन शाऊलर, मिनटेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड, रिव्हर टर्न, चक्रवाक, स्पॉड बिल डक, ब्राह्मणी डक व्हाईट आय बीज, कोम डक, जिकाना, लेसर, तरंग, वैष्णव, हळदीकुंकू, चांदवा, नयनसरी, तलवार, पांढरा शरारी, मोरशरारी मुग्धबलाक, चिमण्या, पर्लल मुरेन, जांभळी पाणकोंबडी, जांभळा बलक, लाल डोक्याची टिटवी खंड्या असे अनेक पक्षी येथे वास्तव्यासाठी असतात.

अनेक विविध रंगांचे, आकारांचे, आवाजांचे हजारो पक्षी येथे दिसतात. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान विविध रंगांचे, मंजुळ आवाजाचे दुर्मिळ पक्षी अनेक देशांमधून या अभयारण्यात हजर होतात. कडाक्याच्या थंडीत येथे पर्यटकांची वर्दळ वाढते. शेकडो पक्षीप्रेमी कॅमेरे व दुर्बीणी घेऊन पक्षी निरीक्षणासाठी येथे जातात. निसर्गात मुक्तपणे विहार करणारे विविध पक्षी येथे येणाऱ्यांना प्रचंड आनंद देतात. येथील जलाशयाभोवतीही विविध पक्षी पाहता येतात. हे पक्षी पाहणे, त्यांचा मंजुळ आवाज ऐकणे, हा अनुभव अतिशय विलक्षण असतो. या अभयारण्यात युरोप, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, पाकिस्तान या भागांतून हजारो किलोमीटर अंतर कापून पक्षी येतात. आतापर्यंत अशा 250 वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांची नोंद केली गेली आहे. येथे पर्यटन हंगामात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते.







10,826