पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक

इराणवर झालेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपली सुरक्षा यंत्रणा सतर्क केली आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तेवीस जून रोजी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत संरक्षण, परराष्ट्र, गृह, माहिती आणि अर्थमंत्री तसेच लष्करप्रमुख, गुप्तचर संस्था प्रमुख आदी उपस्थित होते.

या बैठकीत मध्यमपूर्वेतील तणाव, सीमाभागातील स्थिती, देशाच्या सुरक्षेवर होणारा संभाव्य परिणाम यासह, प्रादेशिक शांतता राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे नियोजन करण्यात आले. पाकिस्तान सरकारने अमेरिकेच्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध करत ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान शरीफ यांनी इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, पाकिस्तान इराणसोबत खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही दिली. त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ राहतील, असे आश्वासन दिले.

पाकिस्तानने यानंतर दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितले की, प्रादेशिक स्थैर्यासाठी युद्ध नव्हे, तर संवादच एकमेव मार्ग आहे. शांतता, सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन हाच पाकिस्तानचा दृष्टिकोन असून, या संदर्भात कोणतीही एकतर्फी कारवाई स्वीकारली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.