अमेरिकेत या देशातील नागरिकांना नो एन्ट्री

अमेरिकेच्या सरकारने बार देशांच्या नागरिकांना देशात प्रवेशास बंदी घालणारा निर्णय घेतला आहे. ही बंदी नऊ  जून २०२५ पासून लागू होणार असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

या नव्या आदेशानुसार अफगाणिस्तान, इराण, येमेन, लिबिया, म्यानमार, हैती, सोमालिया, सुदान, चाड, कॉंगो, एरिट्रिया आणि इक्वेटोरियल गिनी या देशांतील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या व्हिसावरून अमेरिकेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, क्युबा, व्हेनेझुएला, लाओस, टोगो, बुरुंडी यांसारख्या सात देशांवरील अंशतः निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

अलीकडे कोलोराडो राज्यातील बोल्डर शहरात ज्यू समुदायावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात एका अनधिकृत विदेशी नागरिकाचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या.

या निर्णयामुळे विविध देशांतील प्रवासी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना अमेरिकेतील प्रवेशावर परिणाम होणार आहे. मानवी हक्क संघटना आणि काही आंतरराष्ट्रीय नेत्यांनी या निर्णयावर टीका केली असून, ही बंदी लक्षवेधी आणि विभाजनकारी असल्याचे मत व्यक्त केले आहे.

सरकारने मात्र स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बंदी आदेशाच्या विरोधात काही देशांकडून कायदेशीर आव्हानही दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.