कागद उद्योग

भारतातील कागद उद्योग हा एक कृषी-आधारित उद्योग आहे. जागतिक स्तरावर ‘भारतीय कागद उद्योग’ उच्च स्थानावर आहे. देशातील पहिली कागद गिरणी इसवी सन 1812 मध्ये सेरामपूर-बंगाल येथे स्थापन झाली; परंतु कागदाच्या मागणीअभावी ती अयशस्वी झाली. सन 1870 मध्ये कोलकाता जवळील ‘बालीगंज’ येथे हा उपक्रम पुन्हा सुरू झाला. भारत सरकार कागद उद्योगाला ‘गाभा उद्योग’ म्हणून परिभाषित करते. कागद उद्योग कच्चा माल म्हणून लाकडाचा वापर केला जातो.
आपण सर्वजण दररोज कागद वापरतो. कागद बनविण्याकरिता काही प्रकारची तंत्रे आहेत. कागद व्यवसाय करण्यासाठी कागद कसा बनविला जातो, याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. झाडांपासून कागद बनविला जातो. आपल्याकडे असलेल्या झाड आणि लाकडाच्या प्रकारानुसार त्याचा कागद बनविता येतो का, हे ठरविले जाते. लाकडाचे स्वरूप आणि त्याची मागणी यावर अनेक प्रकारचे उपयोग अवलंबून आहेत.
तंत्रज्ञानाचा वापर जागतिक स्तरावर होत असला तरीही जगभरात कागदाचा बराच मोठा वापर अजूनही आहे. वर्तमानपत्र, पुठ्ठा,खोके, पुस्तके, वह्या यासाठी कागदाची आवश्यकता असते. कागद लिहिण्यास, छपाईस वा वेष्टनासाठी वापरले जाणारे एक साहित्य आहे. लाकूड, बांबू, चिंध्या, गवत इत्यादीच्या ओल्या सेल्युलोजच्या लगद्याचे तंतू विशिष्टरीत्या दाबून वाळवले की मग कागद तयार होतो.
पाण्यात वेगवेगळे पदार्थ मिसळून मऊसर, ओलसर तयार केलेला पदार्थ म्हणजे ‘लगदा’ होय. कागद तयार करण्याच्या पद्धतीत लगदा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लगदा हा मुख्यत: 3 प्रकारचा असतो. लगद्याच्या पहिल्या प्रकारात लाकडाच्या भुशामध्ये फक्त पाणी घालून तो तयार करतात. लाकडातील लिग्निन, हेमीसेल्यूलोजसारखे नैसर्गिक पदार्थ आणि अनावश्यक पदार्थ लगद्यातून काढून टाकले जात नाहीत. कोणतेही रासायनिक पदार्थ यात घातले जात नाहीत. या प्रकारचा लगदा हा ‘यांत्रिक लगदा’ होय. लगद्यावर यांत्रिक प्रक्रिया करून कागद तयार केला जातो. हा कागद वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरतात.
दुसऱ्या प्रकारचा लगदा तयार करण्यासाठी लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या हे पदार्थ वापरले जातात. सुरुवातीला कापडाच्या चिंध्या रंगीत असतील तर क्लोरिन वायूने त्या चिंध्या धुतात. लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या या वनस्पतीजन्य पदार्थामध्ये सेल्यूलोजचे तंतू असतात. शिवाय लिग्निन, रेझीन, मेण, असे इतर पदार्थसुद्धा असतात. यातील लिग्निन, रेझीन, मेण हे पदार्थ लगद्यामधून बाहेर काढावी लागतात. त्यासाठी सर्व लगदा पापडखाराच्या पाण्यात टाकून शिजवितात. पापडखारात शिजवल्यामुळे लगद्यातील मळ निघून जातो. हा ‘अर्ध रासायनिक लगदा’ होय. या लगद्यापासून मिळणारा कागद मध्यम प्रतीचा असतो. या कागदाचा कारखान्यातील काही वस्तूंची बांधाबांध करण्यासाठी होतो.
तिसऱ्या प्रकारच्या लगद्याला ‘रासायनिक लगदा’ म्हणतात. रासायनिक लगद्यामधील रसायनांमुळे लिग्निन हा पदार्थ विरघळतो. या प्रक्रियेला ‘पाचन क्रिया’ म्हणतात. या प्रक्रियेत कपडय़ाचे तुकडे, गवत, झाडाच्या साली सर्व एकत्र करून कॉस्टिक सोडा आणि सोडियम सल्फाइड यांच्या द्रावणांमध्ये पाचक यंत्रात 3 तास शिजवितात. पाचक यंत्रामध्ये शिजवलेला लगदा काळा असतो. हा लगदा पहिल्यांदा पाण्याने आणि नंतर क्लोरिन या विरंजकांनी स्वच्छ धुतात. या क्रियेनंतर स्वच्छ पांढरा लगदा मिळतो. रसायनांचे प्रमाण जास्त झाले तर सेल्यूलोजचे तंतू तुटतात. त्याचा परिणाम कागदाच्या गुणवत्तेवर होऊन तो ठिसूळ होतो. रासायनिक लगद्यापासून तयार झालेला कागद लिहिण्यासाठी वापरतात. कागद कारखान्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या लगद्यामुळे वेगवेगळ्या प्रतीचे कागद मिळतात.
कागदाला बाजारात मोठी मागणी आहे. अलीकडे कागदपत्रे डिजीटल होऊ लागल्यामुळे कागद कमी लागत असला तरीही कागदाचे महत्त्व आजही तेवढेच आहे. हा उद्योग करायचा झाल्यास त्याबाबतचे प्रशिक्षण घ्यायला हवे. कुशल मनुष्यबळ, भांडवल, कच्चा माल या सगळ्याचा अभ्यास आणि नियोजन करायला हवे.