रायगडमधील वाघोशी पंचक्रोशीत वीजपुरवठा खंडित

वाघोशी आणि परिसरातील पंचक्रोशीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या पली कार्यालयावर जोरदार निदर्शने केली. नागरिकांनी कार्यालयाला घेराव घालून कायमस्वरूपी वीज जोडणी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली.
गेल्या अनेक महिन्यांपासून वाघोशी पंचक्रोशीतील गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. काही वेळा वीज दोन–तीन दिवसांपर्यंतही गायब राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास, शेतकऱ्यांचे मोटारपंप, घरगुती कामे आणि व्यावसायिक व्यवहार यावर परिणाम होत आहे.
वाघोशी परिसरातील अनेक घरांमध्ये अजूनही स्थायी वीजजोडणी नाही, असा आरोप करण्यात आला. त्याशिवाय, जेथे वीज आहे तेथेही पुरवठा खंडित होतो. त्यामुळे कायमस्वरूपी वीज जोडणी त्वरित देण्यात यावी, अशा मागण्या लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समस्या ऐकून घेतली आणि लवकरात लवकर दुरुस्ती व सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, गावातील वीज व्यवस्थापनाचे सर्वेक्षण करून दोष दूर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
वाघोशी पंचक्रोशीत वीजपुरवठा ही मोठी समस्या बनली आहे. ग्रामस्थांचे संयम सुटू लागल्याने त्यांनी थेट आंदोलनाचा मार्ग अवलंबला. या प्रश्नावर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास, ग्रामस्थांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.