रशियाकडून कीव शहरावर जोरदार हवाई हल्ला

रशियाने युक्रेनच्या राजधानी कीव शहरावर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला. या भीषण हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरून गेले असून, भूकंपासारखे जोरदार धक्के अनेक भागांमध्ये जाणवले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी घरांची आणि इमारतींची मोठी हानी झाली आहे.

कीवमध्ये एका पाठोपाठ झालेल्या तेरा स्फोटांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. या हल्ल्यात किमान दहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, काही लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक नागरिक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. घरांचे, गाड्यांचे आणि अपार्टमेंटच्या खिडक्या, दरवाजे उद्ध्वस्त झाले आहेत.

हल्ल्यात रशियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा एकत्रित वापर केला. हल्ला इतका प्रचंड होता की, प्रत्येक काही सेकंदांमध्ये एक स्फोट होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. हवेत सतत धूर, स्फोटांचा आवाज आणि धगधगतं वातावरण यामुळे नागरिक भयभीत झाले होते.

हल्ल्यानंतर आपत्कालीन बचाव पथकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून नागरिकांना बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीची हालचाल सुरू केली असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.

या हल्ल्यामुळे कीवमधील नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रशियाने म्हटले आहे की, त्यांचे लक्ष्य लष्करी केंद्र होते, मात्र प्रत्यक्षात नागरी वस्त्यांवर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.







13,243