संजीवनी बेट

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एक लोकप्रिय हिरवीगर्द टेकडी आहे. हे एक जैवसमृद्ध असे क्षेत्र आहे. ‘वडवळ नागनाथ’ गावाजवळ असलेली ही टेकडी तिच्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे ‘संजीवनी बेट’ म्हणून ओळखली जाते. हे ठिकाण चाकूरपासून १६ किमी अंतरावर असून लातूर शहरापासून ३९ किमी अंतरावर आहे. संजीवनी बेटास ‘वडवळ नागनाथ बेट’ या नावानेही ओळखतात. हे बेट आयुर्वेदिक झाडे आणि वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ प्रजातींचे घर म्हणून ओळखले जाते. येथे जुलै ते सप्टेंबर या पावसाच्या महिन्यात अनेक दुर्मिळ वनस्पती वाढतात. अनेक ठिकाणचे आयुर्वेदिक अभ्यासक आणि संशोधक दुर्मिळ वनस्पतींच्या शोधात या ठिकाणास भेट देतात.

जगात कुठेही न आढळणारे असे चुंबकीय क्षेत्र येथे आहे. जिथे १०० फुटांपेक्षा अधिक व्यास असलेल्या जागेत लोटांगण अवस्थेत २ मिनिटे शरीरासह मन स्थिर करून बाजूला तीन-चार गिरकी घेतल्या की तुमचा शरीरावरील ताबा सुटतो. शरीर आपोआप घरंगळत जाते. त्या व्यक्तीला जोपर्यंत अन्य कोणी थांबवत नाही, तोपर्यंत काही अंतरापर्यंत व्यक्ती घरंगळत जाते. महाराष्ट्र सरकार आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी आणि प्राथमिक आरोग्य सेवेसाठी पारंपरिक उपायांचा वापर करणाऱ्या स्थानिक चिकित्सकांसाठी या परिसरात वैद्यसंमेलनाचे आयोजन करते.

औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी सरकारने संशोधन केंद्रही स्थापन केले आहे. येथे राहणाऱ्या स्थानिक जमातींशी पर्यटक संवाद साधू शकतात. त्यांच्याकडून संजीवनी बेटावरील वनस्पतींची माहिती मिळू शकते. ‘वडवळ नागनाथ बेट्टा’ येथे आणि आजूबाजूला अनेक आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचार रुग्णालये आणि वैद्यकीय दुकाने आहेत. तिथे आपण खरेदी करू शकता. येथील संशोधन केंद्र सकाळी ९.०० वाजता उघडते. त्यामुळे सकाळी ८.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेत कधीही भेट देऊ शकता.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
17,725 वेळा पाहिलं