अंतूरगड किल्ला

उत्तुंग मजबूत गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या किल्ल्यांनी जवळपास अवघा महाराष्ट्र व्यापला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या रांगेवर अंतुरगड आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली हा किल्ला आहे. अंतूरच्या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यातील एक मार्ग कन्नडकडून गौताळा अभयारण्यामधून जातो. दुसरा मार्ग जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधून आहे. हे दोन्ही मार्ग अंतूरच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येतात.

डोंगरउतारावर भरपूर झाडी आहे.मलीक अंबरच्या काळात येथे काही बांधकामे झाली. पुढे मोगली वावटळीत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. गडाचा समोरचा दरवाजा चटकन दिसत नाही. या दरवाजाबाहेर पहारेकऱ्यांच्या जागा आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत या दरवाजाला लाकडी दारे होती. ती आता दिसत नाहीत. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. पुढचा दरवाजा मात्र भव्य आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूला अनेक शिल्पे पहायला मिळतात. येथे सजावटीसाठी तोफेचे चार गोळे वापरले आहेत. तिसऱ्या दारावर भव्य असा फारशी शिलालेख आहे.

गड दक्षिणोत्तर पसरलेला असून तटबंदीने वेष्टित आहे. डावीकडे एक टेकडी असून टेकडीच्या दक्षिण बाजूला मोठा तलाव आहे. टेकडीच्या उतारावर भव्य इमारत आहे. टेकडीच्या माथ्यावर टेहळणीकरिता चौथरा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱ्या आहेत. या चौथऱ्यावरून संपूर्ण गडावर लक्ष ठेवता येते. या किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबर याचाही ताबा मिळवला.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
19,276 वेळा पाहिलं