शालेय शिक्षण विभागाकडून सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर

शालेय शिक्षण विभागाने २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या सुट्ट्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना एकूण एकशे अठ्ठावीस ते एकशे एकोणतीस दिवस सुट्टी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या सुट्ट्यांमध्ये सर्वांत मोठा हिस्सा आहे उन्हाळी सुट्टीचा असून ही सुट्टी 2 मे ते 13 जून या कालावधीत असेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना अठ्ठेचाळीस दिवसांची सलग विश्रांती मिळणार आहे. याखेरीज दिवाळी सुट्टी 16 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत दहा दिवसांची असणार आहे.
याव्यतिरिक्त वर्षभरात येणारे रविवार, सार्वजनिक आणि विशेष सुट्ट्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. या सर्व सुट्ट्यांचा एकत्रित विचार केल्यास एकशेएकोणतीस दिवसांपर्यंतचा विश्रांतीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक सण, उत्सव किंवा आपत्तीजन्य परिस्थितीमुळे सुट्ट्यांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शाळांचे वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले असून, नियमित शाळा सकाळी साडेदहा ते संध्याकाळी पाच या वेळेत चालतील, तर अर्धवेळ शाळा सकाळी नऊ ते दुपारी दीड या वेळेत सुरू राहतील. सर्व मुख्याध्यापक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.