गावागावात स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी

राज्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अचूक हवामान माहिती मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या ‘विंड्स’ या उपक्रमाअंतर्गत गावागावात स्वयंचलित हवामान माहिती केंद्रे उभारण्यास सुरुवात झाली आहे. बदलत्या हवामानामुळे शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनासमोर नवे आव्हान निर्माण झाले असून, त्यावर उपाय म्हणून हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
या केंद्रांद्वारे तापमान, पावसाचे प्रमाण, वाऱ्याचा वेग व दिशा, आर्द्रता आणि वायुभार यांची नोंद चोवीस तास सातत्याने केली जाईल. ही सर्व माहिती संगणकीय प्रणालीतून शासनाच्या हवामान पोर्टलवर पाठवली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी कृषी सल्ला मिळेल, विमा दावे सादर करताना आधारभूत माहिती मिळेल आणि प्रशासनालाही आपत्ती व्यवस्थापनात मदत होईल.
या केंद्रांसाठी ग्रामपंचायतीमार्फत सुमारे पाच मीटर बाय सात मीटर एवढी मोकळी जागा देण्यात येणार आहे. डोंगराळ किंवा कमी उपलब्धतेच्या ठिकाणी पाच बाय पाच मीटर इतकी जागा पुरेशी समजली जाईल. हवामान उपकरणे ठराविक उंचीवर लावण्यात येणार असून, ती नियमितपणे स्वयंचलितपणे माहिती नोंदवतील.
या योजनेचा खर्च राज्य व केंद्र शासन मिळून करणार आहेत. पहिल्या वर्षी केंद्र सरकार ऐंशी टक्के आणि राज्य सरकार वीस टक्के, दुसऱ्या वर्षी साठ टक्के केंद्र आणि चाळीस टक्के राज्य, तर तिसऱ्या वर्षी पन्नास टक्के दोन्ही शासनांकडून खर्च केला जाणार आहे. या खर्चात हवामान यंत्रणेचे स्थापत्य, देखभाल आणि माहिती व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
या केंद्रांची जबाबदारी ग्रामसेवक किंवा स्थानिक अधिकारी यांच्याकडे सोपवली जाणार असून, उपकरणे सुरळीत चालू राहावीत यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यंत्रणा बिघडल्यास माहिती तात्काळ वरीष्ठ यंत्रणेला कळवणे, केंद्राचा नियमित आढावा घेणे, तसेच गावात हवामानाबाबत जनजागृती करणे हे त्यांच्या कामात समाविष्ट असेल.