श्री नृसिंहवाडी

दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या नृसिंहसरस्वतींचे स्थान म्हणजे नृसिंहवाडी होय. कोल्हापूर जिल्ह्यात मिरजेपासून जवळ, कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर हे ठिकाण आहे. श्री नृसिंहसरस्वती यांचे येथे १२ वर्षे वास्तव्य होते. नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणारे हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये ‘दत्तप्रभूंची राजधानी’ म्हणून प्रसिद्ध आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंब्येस्वामींनीही भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले होते. कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान त्यांचा मुक्काम औंदुबर क्षेत्री होता.

नृसिंहसरस्वतींनी येथे बारा वर्षे तपश्चर्या केली. त्यांनी येथील औदुंबर वृक्षाखाली पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली. आपण येथे वास करू, अशी ग्वाही त्यांनी भक्तजनांना दिली. नृसिंहसरस्वतींच्या वास्तव्यामुळेच या क्षेत्राला ‘नृसिंहवाडी’ असे नाव पडले. याला ‘नरसोबाची वाडी’ असेही म्हणतात. हे ठिकाण मनास एकाग्रता प्रदान करते. आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करण्यासाठी येथे मानसिक शांतता लाभते. त्यामुळे आध्यात्मिक भूक असणारी भक्तमंडळी येथे आवर्जून उपस्थित राहतात. नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केले. येथे दिवसभर साधना, उपासना भक्ती सुरू असते.

नदीतीरामुळे लाभलेली निसर्गसमृद्धता, वातावरणातील भक्तिभाव, आणि विस्तीर्ण कृष्णा नदीचे पात्र यामुळे हे ठिकाण भाविकांना प्रचंड आनंद देते. या तीर्थक्षेत्रावर दत्तभक्तांची नेहमीच वर्दळ असते. पहाटे तीनपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, धूपदीप आरती, पालखी सोहळा असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही येथे होतो. रोजचा पालखी सोहळा अनुभवण्यासारखा असतो.

पावसात महापुराचे पाणी येथील पादुकांना स्पर्श करते. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर उत्सव मूर्ती हलवली जाते. आज येथे खूप मोठ्या प्रमाणात धर्मशाळा, भक्तनिवास आहेत. हे वर्षभर गजबजलेले असते. नदीकिनारी बांधलेल्या घाटावरुन कृष्णेचे पात्र डोळे भरुन पाहता येते. असे म्हणतात की, विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून येथे प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ मिळाल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे या मंदिराला कळस नाही. श्री दत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंहसरस्वती येथे वास्तव्यास असताना येथे त्यावेळी निर्जन अरण्य होते. आज येथील भाविकांची वर्दळ वाढली असून दत्तप्रभूंच्या जयघोषाने हा परिसर भक्तीभावात चिंब भिजलेला आहे.







15,169