चीनच्या चंद्र मोहिमेची यशस्वी चाचणी

चीनने २०३० पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. ‘मेंगझोउ’ या नव्या मानववाहू अंतराळयानावर आपत्कालीन बचाव चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. ही चाचणी चीनच्या गांसू प्रांतातील जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून करण्यात आली.

या चाचणीचा उद्देश अंतराळात एखादी तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे यानातून वेगळं करून पृथ्वीवर परत आणण्याच्या यंत्रणेची अचूकता तपासणे हा होता. चाचणीदरम्यान यानाच्या एस्केप प्रणालीने योग्य वेळी कार्य केलं, रिटर्न कॅप्सूल यशस्वीपणे पृथ्वीवर परत आली आणि पॅराशूटच्या साहाय्याने लँडिंगही करण्यात आलं.

‘मेंगझोउ’ या यानात भविष्यात सहा ते सात अंतराळवीरांना नेण्याची क्षमता असणार असून, यात नव्या युगातील नियंत्रण प्रणाली, मॅन्युअल आणि स्वयंचलित दोन्ही पद्धती समाविष्ट आहेत. या तंत्रज्ञानाच्या आधारे चीन चंद्रभूमीवर उतरू शकणाऱ्या यानांमध्ये जागतिक आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

या यशस्वी चाचणीनंतर चीनने स्पष्ट केलं आहे की, पुढील टप्प्यात ‘लाँग मार्च १०’ रॉकेट आणि ‘लानेयू’ लँडरच्या साहाय्याने चंद्रमोहिमेची तयारी पूर्ण केली जाईल. २०३० पर्यंत मानवाला चंद्रावर उतरवण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी चीनकडून पावलं अधिक वेगाने उचलली जात आहेत.